Support For Rahul Gandhi : आरक्षणासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात 13 सप्टेंबर रोजी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. अकोल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. आता काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपच्या माजी आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं.
कारवाई का नाही?
देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले. आता पुन्हा एक गांधी संपविण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर कारवाई करत नाही. हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचा आरोपही आंदोलनात करण्यात आला. अकोला शहर काँग्रेसने शहराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. भाजपचा धिक्कार केला. अकोल्यातील स्वराज्य भवन येथे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धमकी निषेधार्ह
आंदोलनात कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना धमकी देणारे भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या अटकेची मागणी केली. मारवा यांचे वक्तव्य हा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची अॅलर्जी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करीत असतात. आता भाजपाने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढण्यात आला. माथी भडवण्याचा प्रकार भाजप करीत आहे. राहुल गांधी यांच्या या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी दिली जात आहे, अशी टीका करण्यात आली.
Buldhana : राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस आक्रमक
भूमिका स्पष्ट करावी
गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झालेत. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे. तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. तरविंदरसिंह मारवा हे भाजपच्या द्वेषपूर्ण आणि हिंसक राजकारणाच्या कारखान्यात तयार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, कपिल रावदेव, प्रशांत प्रधान, तपस्यू मांनकीकर, पंकज देशमुख, पंकज राठी, आकाश कवडे, अभिजित तवर, पूजा काळे, अर्जुन थानवी, तश्वर पटेल, अब्दुल्ला, प्रदीप वखारिया आदी उपस्थित होते.