Lack Of Infrastructure : बुलढाणा जिल्ह्यातील हिंगणा काझी गावात मुस्लिम समाजातील मयताच्या अंत्यविधीसाठी नदीतून ग्रामस्थांना वाट काढावी लागली. कमरेएवढ्या पाण्यातून आपला जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत नदीच्या पलीकडे असणार्या मुस्लिम स्मशानभूमीत काही जण पोहोचले. त्यानंतर पार्थिव ट्रॅक्टरमध्ये ठेऊन दुसऱ्या काठावर नेण्यात आले. हिंगणा काझी या गावात मुस्लिम स्मशानभूमी नदी पलीकडे आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याची अनेक वेळा वाट पाहावी लागते. प्रशासनाला यापूर्वी अनेकदा नदीवर पूल बांधण्याची विनंती करण्यात आली. परंतु पूल होत नसल्याने नागरिकांवर असा प्रसंग ओढवला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी या गावातील नदीवर पूल नाही. त्यामुळे गावातील व्यक्तीचे निधन झाल्यास कब्रस्तानमध्ये नेण्यासाठी नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. असाच प्रसंग पुन्हा एकदा निर्माण झाला. गावातील एका महिलेचे निधन झाले. या महिलेचे पार्थिव अंत्यविधीसाठी कब्रस्तानमध्ये नेण्यासाठी नागरिकांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला. पावसाळ्यात नेहमीच गावकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वर्षापासून नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अजूनही नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही.
मूलभूत सुविधांचा अभाव
आजही अनेक गावांमध्ये चांगले रस्ते किंवा पूल नाहीत. त्यामुळे नागरिकांना नदीतून मार्गक्रमण करावे लागते. हिंगणा काझीत अनेकदा नदीवर पूल नसल्याने अंत्ययात्रेसह ग्रामस्थांना नदीतून प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था ही नित्याच्याचीच बाब आहे. जिवंतपणी तर नाहीच, परंतु मृत्यूनंतरच्या अखेरच्या प्रवासासाठीही चांगला रस्ता मिळू नये, यासारखे दुर्दैव नाही.
रस्त्याची दूरवस्था
हिंगणा काझी येथील मुस्लिम स्मशानभूमीकडे (कब्रस्थान) जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गाव आणि कब्रस्ताच्या मधून नदी वाहाते. या नदीला पावसाळ्यात पाणी राहते. त्यामुळे नागरिकांना नदीच्या पलीकडे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशात गावात कोणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्काराला जावे लागते. त्यासाठीही नदी पार करावी लागते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नदीतून पाणी वाहत राहाते. त्यामुळे पार्थिव पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांचा संताप आता वाढत आहे.