महाराष्ट्र

Ramdas Athawale : राहुल गांधींना दलित, मागासवर्गीय धडा शिकवतील 

Mumbai : आरक्षण संपविण्याच्या भाषेवर रिपाइंचे आंदोलन 

Reservation Issue : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी अमेरिकेत दौऱ्यावर असताना त्यांनी भारतातील आरक्षण संपविण्याबाबत वक्तव्य केले. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे, तोपर्यंत भारताचे संविधान राहील. संविधानाने दिलेले आरक्षण राहील, असे आठवले म्हणाले.  

आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो. खबरदार जर आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर, असा इशारा आठवले यांनी दिला. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने राहुल गांधी यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही रामदास आठवले यांनी केली आहे.

तीव्र संताप 

आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित, आदिवसी, मागासवर्गीय धडा शिकवतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे, हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही, असे परदेशात जाऊन बोलणे अतिशय चुकीचे आहे. लोकतंत्र आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे रामदास आठवले म्हणाले.

भारताची बदनामी का?

परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला’, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केली होती. काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच आरक्षण कसे रद्द करता, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनीही कॉँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली.

Ramdas Athawale : 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्योग वाढले !

नंतर सारवासाराव 

जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करू. भारत सध्या यासाठी योग्य जागा नाही, असं बोलल्याचं राहुल गांधी म्हणाले. आर्थिक आकडेवारी पाहता तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे, असंही बोलल्याचं राहुल म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!