Assembly Elections : बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व गाठीभेटी वाढल्या आहेत. कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे निश्चित नसले तरी, महाविकास आघाडीच्यावतीने निष्ठावान कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव घेण्यात आला आहे.
बाहेरचा उमेदवार नको
बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेले शिंदे गटाचे योगेश जाधव, वसंतराव मगर आणि संभाव्यतः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची चांगलीच राजकीय गोची झाली असल्याचे दिसून येत आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता व नेता गावभेटी घेऊन आपण कसे योग्य आहोत, याचा आरसा दाखवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मागण्यांसाठी योगेश जाधव, वसंतराव मगर, गायत्री शिंगणे, दिनेश गिते यांनी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर शरद पवार हे आमचे दैवत असून, त्यांनीच आम्हाला राजकारणाची दिशा देण्याचे काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे भावनिक उद्गार काढून विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपलाही मार्ग मोकळा असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे.
मागील 2 वर्षांपासून आमदार आणि राज्याचे मंत्रिपद भूषवणारे डॉ. शिंगणे शरद पवार यांचे खांदे समर्थक आहेत. पण सध्या ते अजित पवार गटात आहेत. त्यांच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी मेरा बु. येथील माजी सभापती अशोक पडघान यांनी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव घेण्यात आला आहे. बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
Maharashtra Government : खूप ऐकले राजकीय पक्षांचे इशारे, आता सरकारलाच दिला इशारा !
‘हे’ आहेत उम्मेदवारीसाठी इच्छुक
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. सुनील कायंदे आणि अभय चव्हाण यांनाही पक्षाने ऑफर दिल्याचे समजते. परंतु, तूर्तास त्यांनी पक्ष बदल करण्यास नकार दिल्याचीही माहिती आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून दिलीप वाघ यांनी प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत दिलीप वाघ कोठे होते, याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, दादाराव खार्डे, महेंद्र पाटील, बंद्री बोडखे तर काँग्रेस पक्षाचे माजी सभापती अशोक पडघान, मनोज कायंदे अशी दिग्गज राजकीय पैलवानांची फौज तालुक्यात आहे. असे असताना दुसर्या पक्षांतून आयात उमेदवार स्वीकारणार नसल्याचा सूर उमटत आहे.
उपयोग काय?
शरद पवार यांच्यावर निष्ठा असावी, यात दुमत नाही. परंतु, त्यांनी ती निष्ठा लोकसभा निवडणुकीत दाखवायला पाहिजे होती. लोकसभा निवडणुकीनंतर निष्ठा दाखवून उपयोग काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वसंतराव मगर यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बोलण्यास सांगितले. त्यानुसार अकोला येथे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. परंतु, पक्ष प्रवेशाबाबत गोपनीयता पाळण्यात आली. यांच्याच बाबतीत नाही तर अनेक इच्छुक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.