महाराष्ट्र

Buldhana : रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली!

Ravikant Tupkar : अन्नत्याग आंदोलनाचा परिणाम; छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती

Hunger Strike : चार दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली. 7 सप्टेंबरला सायंकाळी राज्य सरकारच्या बैठकीचे निमंत्रण आले. त्यामुळे त्यांनी आंदोलन तुर्त स्थगित केले. पण, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. चार दिवसांच्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल

सिंदखेडराजा येथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सलग चार दिवस रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती चांगलीच बिघडली होती. राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकर यांना 11 सप्टेंबरच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवले. मात्र आता प्रकृती बघता ते स्वतः बैठकीला उपस्थित होतील की नाही, हे निश्चित नाही.

सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीची १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात ४ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची सरकारने दखल घेतली. अजित पवार व संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना दिले.

या बैठकीसाठी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या मध्यस्थी केली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केली. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले.

थ्रोट इन्फेक्शन व किडनीवर परिणाम

आंदोलन संपल्यानंतर तुपकरांची प्रकृती खालावली. त्यामुळे उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले. त्यामुळे सहकाऱ्यांनी रविकांत तुपकर यांना छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविकांत तुपकरांची शुगर लेवल अत्यंत कमी झाली. थ्रोट इन्फेक्शन व किडनीवरही परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी तुपकर यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.

Ravikant Tupkar : सिंदखेडराजातून पेटली शेतकऱ्यांच्या लढ्याची ज्योत

शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे’

माझ्या प्रकृतीची चिंता करू नका. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होणार आहे. पुन्हा लवकरच बाहेर पडून कामाला लागणार आहे. माझ्या भेटीसाठी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरला येऊ नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!