राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. राज्यातील राजकारण तापलं. या घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत माफी मागितली. आता यावर कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. राज्यभर संताप पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर भाजपकडून महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफीही मागितली. यावरून विरोधकांनी मोदी यांना लक्ष्य केलं आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून आता कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा आहे,’ असं म्हटलं आहे. 7 सप्टेंबरला नाशिकमध्ये असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबतही भाष्य केलं आहे. ‘मला राजकारणात यायला आवडेल,’ असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले?
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना वेदनादायक आहे. मुख्य नेत्याला दोषी धरण्यापेक्षा पुतळा बनवणारा पाचशे टक्के दोषी आहे. विरोधकांचं काम राजकारण करणे आहे. हिंदूंनी संघटित होणे हेच अंतिम काम आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे, असे कालीचरण महाराज म्हणाले. मला संधी मिळाली तर नक्कीच राजकारणात यायला आवडेल असेही कालीचरण महाराज म्हणाले. बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानातील हिंदूंना मुसलमानांनी कापून टाकले. हिंदूंना जागृत व्हावे लागेल, असेही ते म्हणाले.
कोण आहेत कालीचरण महाराज!
काही वर्षांपूर्वी कालीचरण महाराज यांचा शिवतांडव स्त्रोताचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे कालीचरण महाराज प्रकाशझोतात आले होते. हा व्हिडिओ अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कालीचरण महाराज नावाने प्रसिद्ध असलेल्या या महाराजांचं मूळ नाव अभिजित सराग असं आहे. ते मूळचे अकोल्याचे आहे. अकोल्यातील शिवाजीनगर भागात भावसार पंचबंगला याठिकाणी ते राहतात. अकोल्यामध्ये त्यांचं बालपण गेलं आहे. ते एकदा निवडणूक देखील लढले आहेत.