अनेक प्रक्षांना प्रदक्षिणा घालून गोंदियाचे माजी जिल्हा परीषद सदस्य घरी परतले आहेत. त्यांना आपले घर आठवले आहे. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. अर्जुनी मोरगावच्या माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी दोन दिवसांपूर्वी घरवापसी केली आहे. एकेकाळी काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांनी विविध पक्षांमध्ये नशीब आजमावले. आणि आता स्वगृही परतल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा पटोले यांच्या निवासस्थानी झाला. अचानक फोटो व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका फार लांब नाहीत. राजकीय वातावरण हळूहळू तापायला लागले आहे. विधानसभेत कोणता पक्ष मजबुत स्थितीत असेल, कोणता नसेल याची चाचपणी सुरू झाली आहे. ही चाचपणी करण्यात कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांचाच समावेश आहे. कार्यकर्ते तन-मन-धनाने राबायला लागले आहेत.
दुसरीकडे आमदारकीची जागा निश्चित करण्यासाठी अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सोहळे सुरू झाले आहेत. यातच माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांचाही नंबर लागला आहे. त्या 2009 पासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी 2009 ला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना दहा हजार मते मिळाली होती. पुढे भाजपमध्ये प्रवेश करून महागाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.
2014 मध्ये त्यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढण्याची इच्छा दर्शविली. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यावेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. आणि विधानसभा लढविली. पंधरा हजार मते घेऊन त्यांनी आपली ताकद दाखविली. त्यानंतर त्या काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होत्या. राष्ट्रवादीमध्ये त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पटोले यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी सध्या मोठी चढाओढ सुरु आहे. अशावेळी किरण कांबळे यांच्या प्रवेशाने अनेक दिग्गजांचे टेंशन वाढल्याचे बोलले जात आहे.
इनकमिंग जोरात
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत. माजी आमदार असो की माजी खासदार अनेकांचे पक्ष प्रवेश काँग्रेसमध्ये होऊ लागले आहे. दिवसागणिक नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस बळकट होऊ लागली आहे. त्याच्या फायदा विधानसभेत नक्कीच होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यातील काँग्रेसचे रिपोर्ट कार्ड अधिक अपडेटेड दिसणार आहे.