Shiv Sena : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशात बुलढाणा शहरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून 23 महापुरुष आणि संतांचे पुतळे, स्मारक उभारण्यात आले आहेत. या सर्व स्मारक आणि पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या मेळाव्यालाही ते उपस्थित राहणार आहेत.
जयश्री शेळके यांची मागणी
मालवण (Malvan Rajkot) प्रमाणे बुलढाण्यात अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरातील सर्व पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. हे ऑडिट सार्वजनिकपणे जाहीर करण्यात यावे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यांचे अनावरण करू नये, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी याआधीच केली आहे. असे असतानाही शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची माहिती दिली.
पुतळे म्हणजेच विकास?
एकनाथ शिंदे बुलढाण्यात येतील. त्यानंतर ते अनावरण कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळाव्याला ते हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांचा महामेळाव्याची तयारीही जोरात आहे. एकनाथ शिंदे 19 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता बुलढाणा दौर्यावर येणार आहे. बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचा लोकार्पण सोहळाही होणार आहे. बीएससी अँग्री कॉलेजचे भूमिपूजनही ते करणार आहेत. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिवसेना पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. त्यातून राजकीय खलबतंही होणार आहेत.
MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा
पोलिसांची टेन्शन वाढले
बुलढाणा शहरात महापुरुष, संतांची पुतळे आणि स्मारक उभारण्यात आले आहेत. याच सर्व स्मारक आणि पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मालवण प्रमाणे बुलढाण्यात अनुचित घटना घडू नये, यासाठी ऑडिटची मागणी आहे. मात्र ऑडिट करण्यात आलेले नाही. अशातच अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला विरोध होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून नियोजन केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांचे टेन्शन वाढणार आहे. पोलिस सध्या संभाव्य आंदोलन थोपविण्याच्या तयारीत आहे. आंदोलन करणाऱ्या संभाव्य विरोधकांचा शोध पोलिस घेत आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर राहणार आहे.