महाराष्ट्र

Nagpur : गडकरी, फडणवीसांच्या बैठकीत काँग्रेस नेते!

Nitin Gadkari :  नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले

NMC : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महानगपालिकेत बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा दोघांनीही खरपूस समाचार घेतला. कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा कोलमडल्याबद्दल खडसावले. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे माजी मंत्री आमदार नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

विरोधी पक्ष उपस्थित

लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे गडकरींच्या विरोधात उभे होते. दोघांचेही वैय्यक्तिक संबंध चांगले असले तरीही प्रतिस्पर्धी होते. दुसरीकडे नितीन राऊत कायमच शहरातील विकासकामांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची ओरड करत असतात. आज दोघेही बैठकीला उपस्थित होते. दोघांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील यंत्रणांचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप केला.

याशिवाय भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मीना आदींची बैठकीला उपस्थिती होती.

परफॉर्मन्स ऑडिट करा

बैठकीला उपस्थित आमदारांनी शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली असल्याची उदाहरणे दिली. त्यानंतर गडकरींनी या विभागाचे परफॉर्मन्स ऑडिट करण्याचे आदेश दिले. तसेच कचरा व्यवस्थापन, मलवाहिन्यांचे नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्याचा विचार करावा, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले.

निलंबन करा

नागपुरातील कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणारी यंत्रणा कोलमडली आहे. याशिवाय अनेक वस्त्यांमध्ये नाळ जोडणी झालेली नसल्याने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. या कामांसाठी तातडीने मास्टर प्लान तयार करा, असे निर्देश गडकरी यांनी महापालिका आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना दिले. त्याचवेळी जे अधिकारी किंवा कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

नळजोडणी का झाली नाही?

नागपूर शहरात अमृत योजनेतून जलकुंभ तयार होत आहेत. यातील काही जलकुंभ तयार झाले आहेत, तर काही अद्याप व्हायचे आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचण येत आहे. या टाक्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. सोबतच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन पोहोचली असेल तर नळ जोडणी तातडीने करावी, अशा सूचना गडकरींनी दिल्या. अनधिकृत वस्त्या व आरक्षित वस्त्यांमधील मूलभूत सोयी सुविधांसाठी निश्चित धोरण तयार करावे. प्रत्येक कामाचे मॉनिटरिंग करणारी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!