राज्यात सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीला सामोरं जाण्याची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहेत. आता हा तिढा सुटणार असल्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच या जागांवर अनेकांचा डोळा आहे. त्यातील एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय चंद्रकांत सूर्यवंशी आहेत.
या जागांच्या वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला काय असणार आहे, यावर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलं आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता यामध्ये बदल झाल्याचे समजते. न्यायलायकडून सांगण्यात आले आहे की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयांमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तो महाराष्ट्र शासनाचा विषय आहे. सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय मार्गी लागेल अशी शक्यता बळावली आहे, असं रघुवंशी यांनी सांगितलं.
दरम्यान १२ जागांच्या वाटपात नवीन फॉर्म्युल्यानुसार, भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळतील, अशी माहिती चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे,’ असं चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची मी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी देणार, असं वचन मला दिलं होतं. त्या यादीत माझं नाव टाकलं होतं. पण ज्यावेळी उठाव झाला. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. त्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे की, माझा विचार करण्यात यावा, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे.
शिवसेना वाढवायची असेल तर..
माझा मतदारसंघ हा राखीव आहे. आदिवासींसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी मी निवडणूक लढू शकत नाही. पण त्या ठिकाणच्या ज्या दोन जागा आहेत. त्या निवडून देण्यामध्ये आमचा मोठा सहभाग आहे. भविष्यातही शिवसेना वाढवायची असेल तर माझा विचार करण्यात यावा, असं आवाहन मी दोन्ही नेत्यांना केलं आहे, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.