NCP : भाजपा नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आता शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘पवार साहेब से बैर नहीं, मगर समरजीत अब तुम्हारी खैर नही’ असा इशारा दिला. अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेले हसन मुश्रीफ शरद पवारांवर नाराज आहेत. आपण मुस्लीम असल्याने आपल्या विरोधात शरद पवारांनी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र शरद पवारांनी खेळलेल्या खेळीची धास्ती मुश्रीफांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण जोरदार तापलं आहे. अनेक दशके ज्या पवारांचा हात धरून हसन मुश्रीफ यांनी राजकारणाचे धडे गिरवले त्याच हसन मुश्रीफ यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘मी अल्पसंख्यांक असल्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे,’ असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर ‘शरद पवार आपसे बैर नही लेकिन समरजीत घाटगे आपकी खैर नही’ असंही त्यांनी म्हटलं. हसन मुश्रीफांनी समरजीत घाटगे यांना दिलेल्या इशाऱ्यातून निवडणुकीतील संघर्षाचे संकेत दिले आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या इशार्यानंतर समरजीत घाटगे यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘हसन मुश्रीफांनी याआधीही अशा धमक्या दिल्या आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसं सिरीयस घेत नाही. मात्र ज्या नेत्यांनी तुम्हाला मोठं केलं, पदं दिली त्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही,’ असा हल्लाबोल समरजीत घाटगे यांनी केला.
राजाविरुद्ध प्रजा; मग 2009 ला काय होतं ?
मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना कागलची विधानसभा निवडणूक राजाविरुद्ध प्रजा अशी होणार असल्याचं सांगितलं. याला प्रत्युत्तर देताना समरजीत घाटगे म्हणाले, ‘तुम्ही राजाविरुद्ध प्रजा असं म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभे राहिले होते. जर तुम्ही तसं म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा पराभव केला का?’
Assembly Election : मुस्लिमांना उमेदवारी द्या; नाहीतर जागा दाखवू
गैबी चौकात शक्ती प्रदर्शन
मंत्री हसन मुश्रीफ यांची होम पीच असलेल्या कागलमधील गैबी चौकात शरद पवारांची सभा झाली. शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. लाचारांना थारा देऊ नका असं वक्तव्य केलं. घरची महिला स्वाभिमानाची भाषा करत असताना तुमचा नेता लाचार झाला, असं वक्तव्य पवारांनी केलं. शरद पवारांचं हेच वक्तव्य मुश्रीफाच्या व्हारी लागलय. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केले. हसन मुश्रीफाच्या या वक्तव्यावरून समरजीत घाटगेयांनी सुनावले आहे.