Political War : अतीवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे. आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. उलट ‘मीच होणार मुख्यमंत्री’ या स्पर्धेत महायुती व्यस्त आहे, असा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्राची तिजोरी उध्वस्त करणार
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये सध्या ‘मीच होणार मुख्यमंत्री’ ही स्पर्धा सुरू आहे. तिघेही एकमेकांना पछाडण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांना रडणारा बळीराजा दिसत नाही. नराधमांनी अत्याचार केलेल्या पीडित लेकी दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान दिसत नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची ‘खुर्ची’ दिसते. त्या खुर्चीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून इव्हेंट करणे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले. नुकसान झालेला शेतकरी धाय मोकलून रडत आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. मराठवाड्यामध्ये गेल्या चार दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. धुवाधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभे पीक या पावसाने नष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मात्र अजूनही दखल घेतलेली नाही, असे वडेट्टीवार म्हणतात. समाज माध्यमावर पोस्ट करून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार धुर्वेंचे चाललेय काय?
गेल्या चार दिवसांतील धुवाधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. गंभीर समस्येकडे लक्ष न देता आमदार संदीप धुर्वे हे मात्र गौतमी पाटील यांच्यासह नाचण्यात दंग आहेत, अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. लोकांना वाऱ्यावर सोडून धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचत आहेत.
एक ना धड भाराभर चिंध्या
भाजप आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून दिले. जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या मदतीला धावून जायला हवे होते. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैशातून आलेली मस्ती दोन महिन्यात जनता उतरवणार आहे, असेही ते म्हणाले.