Congress Vs BJP : गेल्या दहा वर्षांत भाजपने ज्याप्रकारे सत्ताकारण केेले आहे. त्याचा आता लोकांना कंटाळा आला आहे. खरं तर लोकं आता भाजपचा राग करायला लागले आहेत. त्यामुळे पुढची 20-25 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वैयक्तिक टीकेचा पायंडा भाजपने महाराष्ट्रात पाडला आहे. त्याचा राग जनतेला आहे. त्यामुळे पुढील 20 -25 वर्ष आपला मुख्यमंत्री होईल, असं स्वप्न भाजपने बघू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लाडकी बहिणी वरून महायुतीत श्रेयवाद
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच्या खिशातून लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देत असल्यासारखे वागतायत. महायुतीने दीड हजार रुपये बहिणींना देऊन मते मिळू शकतात अशा भ्रमात राहू नये. बहिणींना माहिती आहे दृष्ट भाऊ त्यांचे संरक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे प्रेम बहिणी ओळखून आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.
बोली लावून बदल्या
वडेट्टीवार म्हणाले, ;सध्या महाराष्ट्रात बोली लावून अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. सत्तापक्षाचे आमदार पोलिसांना गाडी पुसायला लावतात, यावरून अधिकाऱ्यांची मानसिकता महायुतीच्या विरोधात चालली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा यावे, असे अधिकारी आम्हाला दबक्या आवाजात बोलत असतात. तुम्ही लवकर सत्तेत या अन्यथा महायुती महाराष्ट्राला खड्ड्यात घालेल असेही अधिकारी म्हणतात.’ कोल्हापूरचे आरटीओ विजय चव्हाण यांची बदली राजकीय हेतूने झाली आहे का, याची माहिती घेतोय. असे असेल तर त्याच्या चौकशीची मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
दानवेंना ठाकरेंची ताकद कळली
स्वार्थासाठी दुसऱ्याचा पक्ष फोडण्याचे किळसवाणे राजकारण भाजप करत आहे. लोकसभेत पराभवाचे खापर रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले. यावरून रावसाहेब दानवे उद्भव ठाकरेंची ताकद ओळखू लागले आहेत, असेच सिद्ध होते. स्वार्थासाठी इतरांशी दगाफटका करण्याचे काम भाजप करत आहे. एखाद्याचा पक्ष फोडणे त्यांचे चिन्ह हिसकावून घेणे असे किळसवाणे राजकारण भाजपा करत आहे. या पापाचे प्रायश्चित लवकरच करावे लागणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
पडळकर वाटेकरीने चिंतेत
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘चिंतातूर पडळकर सरकार विरोधी भूमिका घेत संपकरी एस टी कर्मचाऱ्यांसोबत आले. भाजपचे वचनभंग केल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. शासकीय सेवेत नियमित करणे, थकीत घरभाडे हप्ता मिळणे आदी प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांचे असून त्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेला आहे. त्याच्या संपाला आपला पाठिंबा आहे.’