Ladaki bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वपूर्ण योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेला राज्यात महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. पण या योजनेचा अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे राज्यात लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची अंमल बजावणीदेखील सुरू आहे. या योजनेत लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
तीन हजार जमा
रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले. त्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला मिळताना दिसून येत आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता. आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत केली आहे. विशेष म्हणजे सप्टेबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत.
थेट 4500 रूपये होणार जमा..
जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली. मात्र जुलै महिन्यांत अनेक महिलांनी कागदपत्रांअभावी अर्ज भरले नाहीत. तर अनेक महिलांचा बँक केवायसीदेखील झालेला नव्हता. त्यामुळे अर्ज भरूनही पैसे आले नाहीत. तर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यांत अर्ज केले. 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू आहे.
Maharashtra Government : महाविकास आघाडीचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत..
योजने पासून वंचित असलेल्या ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत. आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे.
योजनेमुळे निवडणूक लांबणीवर..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यात होणारी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आचारसंहिता लागल्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे केवळ या योजनेसाठी निवडणूक लांबणीवर गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.