प्रशासन

IAS Transfer : ‘द लोकहित’चे वृत्त खरे ठरले; भंडारा जिल्हाधिकारी कुंभेजकरांची बदली

Bhandara Administration : संजय कोलते यांची सरकारकडून नियुक्ती

Change Before Election : भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सेवा विभागाचे हे आदेश काढले. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात सोमवारी (ता. 2) पत्र काढत योगेश कुंभेजकर यांची बदली करण्यात आल्याचे प्रशासनाला कळविले आहे. योगेश कुंभेजकर यांच्या जागेवर संजय कोलते यांना भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले आहे. 

भंडाऱ्यात सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या योगेश कुंभेजकर यांच्यासंदर्भात माजी आणि मिनी पालकमंत्री आमदार डॉ. परिणय फुके नाराज होते. जनतेची कामे वेगाने करीत नसल्याचा ठपका कुंभेजकर यांच्यावर त्यांनी ठेवला होता. वारंवार सांगितलेली कामे होत नसल्यामुळे अखेर डॉ. फुके यांच्या नाराजीची मर्यादा संपली. त्यानंतर त्यांनी योगेश कुंभेजकर यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे डॉ. फुके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांच्या माध्यमातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे कुंभेजकर यांची तक्रार केली.

अनेकांना त्रास

कुंभेजकर यांच्या संदर्भात प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची देखील तक्रार होती. सततच्या बैठक आणि कारवाई यामुळे अधिकारीही त्रासले होते. त्यामुळे कुंभेजकर यांची लवकर बदली व्हावी, अशी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची मनापासून इच्छा होती. अशातच ‘द लोकहित’ने सर्वप्रथम कुंभेजकर यांची बदली होणार असल्याचे वृत्त दिले होते. अधिकाऱ्यांसह मिनी आणि माजी पालकमंत्री कुंभेजकर यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे ‘द लोकहित’ने प्रकाशित वृत्तात नमूद केले होते. विशेष म्हणजे डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांनी तक्रार करताच त्याच दिवशी कुंभेजकर यांच्यासह भंडाऱ्यातील आणखी एका अधिकाऱ्याच्या बदलीची फाइल ‘मुव्ह’ झाली.

IAS Transfer : राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

कुंभेजकर यांच्या बदलीची फाइल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर येते न येते तोच ‘द लोकहित’ने सर्वप्रथम हे वृत्त प्रकाशित केले होते. सोमवारीदेखील (ता. 2) कुंभेजकर यांच्या बदलीचा आदेश सर्वप्रथम ‘द लोकहित’च्या हाती लागला. कुंभेजकर यांच्या बदलीची माहिती मिळताच महसूल प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. एकदाचे जाचातून सुटल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक उपविभागीय अधिकारी (SDO), तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांना फोन करून बदलीची माहिती दिली. कुंभेजकर यांच्या जागी आता संजय कोलते येणार आहे. कोलते ऐन निवडणुकीपूर्वी भंडाऱ्यात येत आहेत. त्यामुळे त्यांची कारकीर्द कशी राहणार, याची उत्सुकता प्रशासकीय वर्तुळात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!