Political War : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारण ही या विषयावरून चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले. तर भाजपकडूनही महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 सप्टेंबरला यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराजांनी सुरत लुटले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इतिहास वाचा
‘आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटले नव्हते. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना त्या लोकांकडून घेतला होता. किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती. जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले होते, अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला. त्यांना माफी मागायला सांगणार आहात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केलं आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्यातील राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून राजकारण तापलं आहे. असे असतांनाच मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीकडून या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपकडून ही आंदोलनाला आंदोलनातून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान 1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस हे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मविआचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत आहे. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्यप्रदेशमध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडला, त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुग गिळून गप्पा का बसले आहेत? कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला, याबद्दल ते का बोलत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा त्यांनी दिली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट!
आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती. जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला. त्यांना माफी मागायला सांगणार आहात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ‘महाराजांनी सूरत लुटले नाही… चुकीचा इतिहास आहे… महाराजांच्या शौर्यावर आक्षेप… हा अक्षम्य गुन्हा आहे! एकदा नाही दोनदा लुटली… फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्याचवेळी इतिहासकारांनी चुकीच्या नोंदी केल्यात का, असेही आव्हाड म्हणाले आहेत.