Malvan Rajkot : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळण्याची ही घटना नक्कीच वेदनादायी आहे. परंतु पुतळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक केवळ राजकारण करीत आहेत. विरोधी पक्षातील नेते केवळ विषारी वक्तव्यबाजी करीत आहेत. एकाही नेत्याने यावर सरकारसोबत बसून चर्चा केली नाही, असे अंजन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या डोळ्यात घातले.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधी पक्षाला प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे. परंतु विरोधक कोणत्याही मुद्द्यावर सकारात्मक सूचना देताना दिसत नाही. केवळ आरोप करतात. मालवण राजकोट येथील घटना नक्कीच दुर्दैवी आहे. अशी घटना घडावी, हे कोणाला स्वप्नातही वाटणार नाही. परंतु या घटनेनंतर विरोधी पक्षांनी केवळ राजकारण सुरू केले.
विरोधी पक्षातील एकाही नेत्याने सरकारशी संवाद साधला नाही. यासंदर्भात विरोधी पक्षांना सकारात्मक सूचना करता आली असती. पुतळ्याच्या अनुषंगाने तपासणी समिती कशी असावी, हे सुचविता आले असते. भविष्यात अशा घटना घडणार नाही, यासाठी एसओपी सुचवता आली असती. परंतु असे होताना दिसले नाही.
केवळ टीकेत धन्यता..
पुतळ्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सगळ्यात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून टिकेला सुरुवात केली. हेलीपॅड तयार केले त्याचे टेंडर का नाही काढले, हा विषयही चर्चेला आला. प्रत्येक काम करताना काही राजशिष्टाचार असतो. ही काही अलीकडच्या काळात सुरू झालेली प्रथा नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरपासून हा राजशिष्टाचार सुरू आहे. अशात बरेचदा पंतप्रधानांचा दौरा अगदी अल्पावधीच्या सूचनेनंतर निश्चित होतो.
मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आहेत. कोविडची महासाथ असताना अशा अधिकाराचा वापर यापूर्वी महाराष्ट्रात झाला आहे. कोविड काळात आपत्ती पाहता विना टेंडर काही कामे करावी लागली. असाच पंतप्रधानांचा दौरा अंतिम क्षणी निश्चित झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना असलेल्या अधिकाराचा वापर त्यावेळी झाला. परंतु विरोधक त्याबाबतही राजकारण करीत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्याचा कारभार चालिवताना प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. परंतु विरोधक हे नियम वाचतच नाहीत का, असा प्रश्न कधी कधी पडतो. नियम माहिती असेल त्यानंतरही विरोधक बोलत असतील तर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत, हे सिद्ध होते.
पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या अखेरच्या क्षणी निश्चित होणाऱ्या कार्यक्रमांबाबत काही सुरक्षेचे प्रोटोकॉलही असतात. परंतु हे सर्व बाजुला ठेवत टेंडर प्रोसेस राबवित बसण्याच्या मुद्द्यावर हे आरोप सुरू आहेत, त्याचे आश्चर्य वाटते. आज जे आरोप करीत आहेत, ते अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांना तर हे सगळे नियम तोंडपाठ असणे अपेक्षित होते, असा चिमटा सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना काढला.