Buldhana : धानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जिल्ह्यात कोणत्या जागा लढवणार हे अद्याप निश्चित नाही. पण आघाडीतील सर्व पक्षांना एकसंध राहून निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन अखिल काँग्रेस महासचिव खासदार मुकूल वासनिक यांनी बुलढाणा येथे केले. शनिवारी (दि.३०) बुलढाणा येथील जिजामाता क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित रोजभारतीयगार महोत्सवात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकांमध्ये एकसंध राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात काँग्रेसला जास्तीत जास्त ताकद द्या. बुलढाणा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. एकसंध राहिलो तर जिल्ह्यात निवडणुकीतील चित्र वेगळे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘वैश्विक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्या संधीचे सोने करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशातील बेरोजगारीचा दर ९.३ टक्के झाला आहे. मधल्या काळात तो ६.३ टक्के होता. आज त्यात वाढ झाली आहे. राज्यात आज बेरोजगार आत्महत्या करत आहेत. युवकांना रोजगाराची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील रोजगार महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे,’ असेही ते म्हणाले.
या महोत्सवाच्या माध्यमातून 1800 युवकांना रोजगार मिळाल्याचे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अॅड. संजय राठोड यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतूल लोंढे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती व रोजगाराच्या संधी या मुद्द्याला हात घातला. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक या मेळाव्यात सहभागी झाले.
या रोजगार महोत्सवात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे प्रदेशाध्य हेमंत सोनारे, उपाध्यक्ष विशाल बावस्कर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार राजेश एकडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, श्याम उमाळकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, अॅड. जयश्री शेळके, दीपक काटोले, विजय अंभोरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक रिंढे व पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बेंडवाल, शैलेश खेडेकर, नितीन राठाडे, मतीन सय्यद, संतोष पाटील, गणेशसिंग राजपूत यांनी प्रयत्न केले.
पाच हजार युवकांना रोजगार
रोजगार महोत्सव 2024 मध्ये पन्नासहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. यामध्ये आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग रिटेल, ॲग्रीकल्चर, फायनान्स, फार्मा, नर्सिंग, डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा समावेश होता. या मेळाव्यात 5000 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या गेल्या. तर उमेदवारांना तत्काळ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. मुलाखत पूर्व प्रशिक्षण शिबिराला विविध ठिकाणी सुरुवातही झाली.