Gadchiroli district : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागली आहेत. अशात गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी डॉक्टरांच्या रांगा लागल्या आहेत. गडचिरोली आणि आरमोरी अशा दोन मतदारससंघांमध्ये इच्छुकांच्या यादीत तब्बल दहा डॉक्टर आहेत, अशी माहिती मिळत आहे.
नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव, डॉक्टरांचे अपुरे संख्याबळ यामुळे येथील नागरिकांना कायम अडचणींचा सामना करावा लागतो. गडचिरोलीतील दुर्गम आणि शहरी भागात सार्वजनिक आरोग्याचे असे थक्क करणारे चित्र महाराष्ट्रासाठी आश्चर्याची बाब नाही. असे असताना देखील गडचिरोली जिल्ह्यातून तब्बल 10 डॉक्टर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
गडचिरोली मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, डॉ. मिलिंद नरोटे असे पाच डॉक्टर भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. डॉ. सोनल कोवे आणि नुकतेच निवृत्त झालेले शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते काँग्रेससकडून इच्छुक आहेत, असे सूत्रांकडून कळते.
आरमोरी मतदारसंघातून डॉ. शीलू चिमुरकर, डॉ. मेघा सावसागडे, डॉ. आशीष कोरेटी हे तिघे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इच्छुक डॉक्टरांनी कंबर कसली आहे. सारेच जोरदार तयारीला लागले आहेत. आपआपल्या क्षेत्रामध्ये दौरे, बैठका घेत आहेत.
सेवेची संधी मिळेल
‘गेल्या दोन दशकांपासून मी आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय आहे. जनतेच्या मागण्यांचा आणि मतांचा मी आढावा घेत आहे. अनेक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा केली. राजकारणाच्या माध्यमातून मोठी वैद्यकीय सेवा मला करता येईल. त्यामुळे समाजाशी जुळलेल्या डॉक्टरांनी राजकारणात जायला हवे,’ असे मत आरमोरीचे काँग्रेसमधील इच्छुक डॉ. आशीष कोरेटी यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येकाला अधिकार
संविधान सर्वांसाठी एक असल्याचे भाजपचे इच्छुक डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले. मी डॉक्टर असलो तरी, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचे अधिकार दिलेले आहेत. गेल्या दशकात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना आम्हाला आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा खूप उपयोग झाला आहे, असे डॉ. मिलिंद नरोटे यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी विरोध केला आहे, तर काही लोक समर्थन करीत आहेत.
हा तर संशोधनाचा विषय
विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी आणि नुकतेच भाजपत प्रवेश झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे दोघे अनुभवी नेते आहेत. परंतु सक्रिय राजकारणात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे योगदान हा संशोधनाचा विषय आहे. तर इच्छुकांमध्ये भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे आणि काँग्रेसचे डॉ. आशिष कोरेटी हे मागील काही वर्षांपासून विद्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.