shocking fact : शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना फक्त महिलांसाठी आहे. हे कुणाला सांगण्याची गरज नाही. पण तरीही अकोल्यात चक्क एका पुरुषानं योजनेचा अर्ज भरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आता चांगलाच गोंधळ उडालेला आहे.
सध्या या योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. छाननी करीत असतानाच पुरुषानं अर्ज भरल्याचं पुढे आलं आहे. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला आहे. मात्र पुरुषाने या योजनेचा अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात मध्यप्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्यात या योजनेची अंमलबजावणी पण करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसेही आले.
या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळत आहे. राज्यात या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. राज्यातील लाखो महिलांनी या योजनेत आतापर्यंत अर्ज केले आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. मात्र अकोल्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होण्याचा प्रयत्न एका पुरुषाकडून करण्यात आला आहे. या पुरुषाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क अर्ज भरल्याचे उघडकीस आले आहे. अकोला तालुक्यातील हा पुरुष असल्याचं छाननी दरम्यान उघडकीस आले आहे.
Assembly Election : शिंदे गटाच्या या आमदाराची उमेदवारी धोक्यात?
नोटीस बजावून जाब विचारणार
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र जी योजना केवळ महिलांसाठी असतानाही या योजनेत पुरुषाकडून अर्ज भरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा अर्ज आता रद्द करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पोर्टलवर महिलांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत पोर्टलवर आलेल्या जिल्ह्यातील महिलांच्या अर्जाची छाननी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये महिलांसाठी असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत अकोला तालुक्यातील एका पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून, महिलांच्या योजनेत अर्ज का भरला, यासंदर्भात प्रशासनाकडून जाब विचारला जाणार आहे.