Chatrapati Shivaji Maharaj statue : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रफटफ पर्सनालिटीसाठी ओळखले जातात. कायम कणखर असं नेतृत्व त्यांचं सगळ्यांनी बघितलं आहे. पण एका प्रसंगावरून ते व्यथित झाले आहेत. आणि त्यांनी चक्क हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे अशी चुक होणार नाही, असा शब्दही दिला आहे. हिंगोली येथे पोहोचलेल्या जनसन्मान यात्रेत त्यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी मालवण येथील घटनेचा उल्लेख निघताच अजितदादांनी पहिले माफी मागितली.
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. या पुतळ्याचे काम चांगलेच व्हायला पाहिजे होते. यातील जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आज शब्द देतो की अशी चुक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.
Mahayuti : ‘मारुन टाकेन’ हे शब्द माझे नाहीत; राणेंचा यू टर्न
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. तर, महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वातील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तत्पूर्वीच याठिकाणी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र उपस्थित होते. त्यामुळे, आदित्य ठाकरेंचा ताफा येताच राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये किल्ल्यावरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरुन राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे.
योजनाचा पाढा
अजित पवार म्हणाले, ‘मी कधीही विरोधकांवर टीका केली नाही. आम्ही कामाची माणसे आहोत. आम्ही 15 हजार कोटींचे वीज बिल माफ केले आहे. शेतकऱ्यांनी आता फक्त मोटर चालू करायची आहे. मागच्या वीज बिलाचा विचार करायचा नाही, बाकी मी पाहतो. वीजबिल माफ केलं आहे. आपल्या राज्याचं बजेट साडे सहा लाख कोटी रुपयांचं आहे. त्यातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे ठेवले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून मी काम करतोय मला माहिती आहे, कसे काम करायचे, असे म्हणत लाडकी बहीण योजना पुढे 5 वर्षांपर्यंत सुरू राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
कायदा आणखीन कडक केला जात आहे
बदलापूरला दुःखद घटना घडली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करू. महिला सुरक्षेला कायमच प्राधान्य दिले जाईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील दोषींना फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार आहे. अशाप्रकारची विकृती पुन्हा कुणाच्या डोक्यात येऊ नये यासाठी कायदा आणखीन कडक केला जात आहे. कोणत्याही पातळीवर हयगय केली जाणार नाही. कोणी हयगय केली तर त्यालाही जेलमध्ये टाकणार, असेही अजितदादा म्हणाले.