Shivaji Maharaj Statue : मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले होते. सोमवारी (ता. 26) हा पुतळा कोसळला. यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीने यावरून सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी याबाबत नागपूरमध्ये (Nagpur) माध्यमांशी संवाद साधला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) माणूस असल्याचे नमूद केले. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शिवरायांच्या या पुतळ्याच्या डोक्यात कापूस आणि कागद असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपटे नावाच्या ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले, त्याला पुतळे उभारण्याचा अनुभव नाही. पहिल्यांदा कंत्राटदाराने असा पुतळा तयार केला. कोणताही अनुभव नसताना त्याला 236 कोटी रुपयांचे काम दिले. पाच कोटी रुपये सौंदर्यीकरणासाठी दिले. काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पुतळा पडला. जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. अशा माणसाला काम देण्याचे कारण काय? अनुभव नसलेल्या माणसाला काम देण्यात आले. त्यामुळे महाराजांचा अपमान करण्याचा धाडस दाखविण्याचा प्रयत्न कसा केला? सगळ्या कामात राज्य आणि केंद्र सरकारने घाई केली, असेही पटोले म्हणाले.
राजीनामा घ्यावा
पुतळ्याच्या घटनेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.आम्ही राजकारण करत नाही. बदलापूरच्या घटनेतही विरोधकांवर त्यांनी हाच आरोप केला आहे, असे काँग्रेसने सांगितले.
महायुतीचे सरकार कमिशनखोर आहे. महायुतीचे सरकार भ्रष्ट सरकार आहे. सरकार महाराजांच्या नावाचा गैरवापर करत आहे. महायुती सरकार हे विधानसभेसाठी राजकारण करत आहे. त्यांनी पातळी पूर्णपणे सोडली आहे. सरकारने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली. पण जे सरकार चार राज्यांची निवडणूक एकाच वेळी घेऊ शकत नाही, ते एक निवडणूक काय घेणार, असे पटोले म्हणाले. त्यांना एक निवडणूक हा नारा द्यायचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्रातील सरकार, केंद्रातील भाजपचे सरकार राजकारण करीत आहेत. महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.