महाराष्ट्र

Eknath Shinde : विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार

Dahihandi Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

Assembly Election : विरोधकांनो सरकारच्या नावाने रडत आहेत.कितीही रडला तरी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवराज प्रतिष्ठानतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधिंच्या मागणीनुसार सरकारने गोविंदाला खेळाचा दर्जा दिला. प्रो-कबड्डी सारखा प्रो-गोविंदा आयोजित होत आहे. गोविंदा देशातच नाही तर सातासमुद्रापार स्पेनलाही पोहोचला आहे. गोविंदांसाठी विमा काढण्यात येत आहे. या सणाला पूर्वी सुट्टी नसायची. आता सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. दोन वर्षांपूर्वी सरकार आले, त्यावेळी सर्व सण, उत्सव बंद होते. त्यानंतरचा दहीहंडी उत्सव महायुती सरकारने निर्बंधमुक्त केला.

सरकार युवकांचे

महायुतीचे सरकार तुमचे, सर्वसामान्यांचे, गोरगरीबांचे आहे. सरकार सर्व क्षेत्रात काम करत आहे. मुंबईत पुढील दोन-अडीच वर्षात एकही खड्डा शोधून सापडणार नाही. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई पॉवर सेंटर झाले पाहिजे. त्यादृष्टीने सरकार काम करत आहे. कमी कालावधीत आम्ही जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आमदार दरेकर यांनी मुंबई बँकेतर्फे एक लाखापर्यंत महिलांसाठी शून्य बॅलन्स खाते उघडण्याचा निर्णय घेतला. सरकार बहिणींबाबत दीड हजारावर थांबणार नाही. जनतेचे ताकद दिली तर दोन, अडीच हजार करण्यात येतील. ताकद वाढली तर तीन हजार रुपयेही करता येतील. महिलांना लखपती झालेले महायुतीला बघायचे आहे.

BJP News : नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस म्हणाले..

सरकारने लाडकी बहीण दिली. आता सुरक्षित बहीण द्यायची आहे. त्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. ज्यांनी माझ्या मुली, महिला, भगिनी, माता यांच्यावर अत्याचार केला, त्या गुन्हेगारांना माफी नाही. हेच सरकारचे धोरण असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. लोकं बोलतात दीड हजारात काय मिळणार. अरे बाबा जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना काय कळणार. माझ्या माता-भगिनींना कळणार. आता तीन हजार खात्यात आलेत. हे सरकार घेणारे नाही, तर देणारे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण हंडी फोडतो. त्या हंडीत काल्याचा प्रसाद असतो. हंडी एकच जण फोडतो, पण प्रसाद सर्वांसाठी असतो. दहीहंडीचा उत्सव हा सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे. सर्व समाज एक आहे, हे सांगणारा उत्सव आहे. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई महिला मोर्चाच्या माधुरी रावराणे, महामंत्री कृष्णकांत दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!