संपादकीय

Nagpur : तर फडणविसांसाठी काटोल सोडणारे दुसरे ‘देशमुख’ ठरतील?

Political War : माजी गृहमंत्र्यांच्या पुतण्यानेही आजमावले होते नशीब

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणविसांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले. पक्षाने परवानगी दिली तर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढेन, असे त्यांनी म्हटले. त्यासाठी त्यांना त्यांचा पारंपरिक काटोल मतदारसंघ सोडावा लागणार आहे. असे झालेच तर काटोल मतदारसंघ सोडून नागपुरात फडणविसांच्या विरोधात शड्डू ठोकणारे ते पहिले ‘देशमुख’ नसतील. यापूर्वी त्यांच्या पुतण्यानेही काटोल मतदारसंघ सोडून नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये नशीब आजमावले होते.

1995 मध्ये अनिल देशमुख पहिल्यांदा काटोलमधून विजयी झाले होते. ती विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. त्यानंतर सलग चारवेळा म्हणजे 2014 पर्यंत ते काटोलचे आमदार होते. पहिल्याच टर्ममध्ये ते सांस्कृतिक राज्यमंत्री देखील होते. तेही शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आजपर्यंत त्यांनी पक्ष बदललेला नाही. विशेष म्हणजे 2014 पर्यंत ते मंत्रीमंडळात होते. 2014 ला मोदी लाटेत देशमुखांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्याच पुतण्याने म्हणजे आशीष देशमुख यांनी भाजपकडून लढत विजय मिळवला. पण आशीष देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देशमुखांचा मार्ग मोकळा झाला. भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांचा पराभव करून अनिल देशमुख पुन्हा एकदा काटोलमध्ये परतले.

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले. ते गृहमंत्री झाले. मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले, बाहेरही आले. पण आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फडणविसांच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे. मात्र काटोल सोडून फडणविसांच्या विरोधात निवडणूक लढणारे ते पहिले देशमुख नाहीत. यापूर्वी 2019 मध्ये आशीष देशमुख यांनी काटोल मतदारसंघ सोडून नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये लढणे पसंत केले. राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या विरोधात लढण्याची तयारी केल्याने आशीष देशमुख चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी फडणविसांपुढे आव्हान उभे केले खरे, पण पराभवच पत्करावा लागला. फडणविसांची लीड कमी करण्यात मात्र त्यांना नक्कीच यश आले होते.

फडणविसांना फरक पडेल?

राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकसभेतील खराब कामगिरीचे खापर फोडण्यात आले. त्यांच्याबद्दल दक्षिण-पश्चिम मतदारसंघातही नाराजी आहे, असे बोलले जाते. स्थानिक समस्यांमध्ये त्यांचा मतदारसंघ आघाडीवर असल्याचे दिसते. अशात अनिल देशमुख यांनी विरोधात लढण्याची तयारी करणे काही प्रमाणात आव्हानात्मक ठरू शकते, यात दुमत नाही. पण असे झालेच, तर फडणवीस विरुद्ध देशमुख हा राज्यातील सर्वांत ‘हाय व्होल्टेज’ सामना ठरेल, हेही महत्त्वाचे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!