Konkan News : मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. सोमवारी (ता. 26) हा पुतळा कोसळला. यावरून आता महाराष्ट्रात राजकीय युद्ध सुरू झाले आहे. महाविकास आघाडीने यावरून सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महायुती सरकारने मात्र कडक कारवाईची ग्वाही दिली आहे. राजकोट येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार आहे. दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
रवींद्र चव्हाण यांनी राजकोट परिसरात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले नौदल दिनाच्या निमित्ताने भव्य पुतळा उभारण्याची नौदलाची कल्पना होती. नौदलातर्फे हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणार होता. परंतु जागेची उपलब्धता नसल्यामुळे राजकोट येथे पुतळा उभारण्याचे अंतिम करण्यात आले. नौदलाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मदत केली होती. राजकोटच्या आसपासची तटबंदी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून नौदलाला देण्यात आला.
पुतळा उभारण्याची प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात झाली. पुतळा उभारणी बाबत निविदेपासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आली आहे. कोकणा मधील हवामानाचा परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्या साठी वापरण्यात आलेल्या धातुवर परिणाम झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. याबाबत 20 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला पत्रदेखील दिले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारला होता. पुतळा उभारण्याचे काम नौदला कडून त्यांना देण्यात आले होते. या कामावर नौदलाचीच देखरेख होती. पुतळ्या कोसळण्याची घटना शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी आहे. पुतळा उभारणीमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्या सर्वांवर चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे चव्हाण म्हणाले.
Chandrapur MP : खासदारांच्या भावालाही लागले आमदारकीचे डोहाळे !
महाराजांच्या नावे भ्रष्टाचार
राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे होत आहेत. भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमिशन खोरीसाठी भाजप सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजप सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा फक्त आठ महिन्यात कोसळला. ही घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणारी घटना आहे. मिंधे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करून घेतले. पुतळ्याच्या नावाखाली निव्वळ इव्हेंटबाजी करण्यात आली. पण कामाच्या निकृष्ट दर्जाचे काय? कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे काय? संसद, श्रीराम मंदिर, अटल सेतू सारखे निकृष्ट कामांचे अनेक नमूने आहेत. देशाने हे सर्व पाहिले. महाराष्ट्रातील जनतेला आपली अस्मिता अवघ्या आठ महिन्यात कोसळताना बघावे लागेल, असे वाटले नव्हते, असे लोंढे म्हणाले.