No Financial Gain : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. या योजनेमुळे राज्यभरातील बहिणींना दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. अनेकांच्या मोबाइलवर तसा संदेशही आला आहे. हा संदेश पाहून महिलांनाही आनंद झाला. मात्र दुसऱ्या दिवशी बँकेत रक्कम काढायला गेल्यानंतर ही रक्कम कर्जखात्यात वळती करण्यात आल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बहिणींचा संताप वाढला आहे.
मुख्यमंत्री भावाने पाठविलेली ओवाळणी बँकेने परस्पर वळती केल्याचा राग आता महिला व्यक्त करीत आहेत.. त्यामुळे बहिणी निराश झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी रक्षाबंधन पूर्वीच दोन महिन्यांची तीन हजार रुपये ओवाळणी त्यांच्या बँक खात्यात जमा केली. 14 ऑगस्टच्या दुपारपासूनच महिलांच्या मोबाइलवर तीन हजार रुपये जमा झाल्याचे एसएमएस यायला लागले. त्यामुळे महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. महिलांची एकमेकींना फोन करून याबाबत विचारणाही केली.
आधार संलग्न खात्यात पैसे
लाभार्थी महिलांचे बँक खाते आधारशी संलग होते. अशा सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. ज्यांचे आधार संलग्न नाही, त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, त्या मोठ्या आनंदाने बँकेत पोहोचल्या. बँकेतून पैसे काढण्यासाठी त्या रांगेत लागल्या. मात्र आपला नंबर आल्यावर त्यांना मिळालेली रक्कम कर्ज खात्यात वळती केल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात आलेले पैसे बँकांनी कपात करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही बँकांनी रक्कम कपात केल्याने योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
बँक नियमानुसार खात्यातील रक्कम परस्पर कर्ज खात्यामध्ये वळती होते. यासाठी बँकांनी ऑटोमॅटिक यंत्रणाच कार्यान्वित केली आहे. कर्ज कपात झाल्यास महिलांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना अर्ज द्यावा लागणार आहे. त्यानंतर ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये परत केली जाईल. तशा सूचनाही सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे महिलांना वारंवार अर्ज सादर करण्यासाठी रांगेत लागवे लागणार आहे. यासंदर्भात अंजना बांते नामक लाभार्थी महिलेने ‘द लोकहित’ला सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली आहे. त्याअंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी तीन हजार रूपयांची ओवाळणी मिळाली. त्याचा मोबाइलवर एसएमएसही प्राप्त झाला. परंतु तीन हजारांची रक्कम बँकेने परस्पर वळती केली. बँकेने असे करायला नको. वळविलेली रक्कम परत मिळणे गरजेचे आहे. आदेश असताना बँकांनी परस्पर रक्कम वळविणे चुकीचे आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा कोणताही फायदा महिलांना होणार नाही.
महिला लाभार्थ्यांनी ज्या बँकेचे खाते अर्जासोबत जोडले आहे. त्याच खात्यात रक्कम वळती करण्यात आली. बँकेमध्ये कमी कमी रक्कम खात्यात शिल्लक ठेवण्याची (Minimum Balance) अट असते. या अटीचे पालन झाले नाही, तर त्याचे शुल्क व दंड वसूल केला जातो. या ओवाळणीतून शुल्क आणि दंडाची ही रक्कमही वसूल करण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांना होणारा हा मनस्ताप दूर करण्याची मागणी होत आहे.