Law & Order Issue : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना आशिर्वाद मिळत आहे. त्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत. शाळेत बालिका सुरक्षित नाहीत. आता तर गुंडांमुळे पोलिसही सुरक्षित नाहीत. मुंबईतील माहिम पोलिस कॉलनीत एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरावर दरोडा पडला. पुण्यात पोलिस उपनिरिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिंमत वाढल्याने हे हल्ले होत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.
मुंबईतील टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सरकारवर हल्ला केला. महायुती सरकारने पोलिसांना कमजोर केले आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली आहे. काही गुंड तर मुख्यमंत्र्यांसोबतच फिरतात. काहींना वायप्लस दर्जाची सुरक्षा पुरविली गेली. काहींना उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना फाइव्हस्टार सेवा पुरविली जात आहे. सरकारी आशिर्वाद असल्यानेच गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत करतात. महायुती सरकारच्या काळात सामान्य जनता सुरक्षित राहिलेली नाही, असे पटोले म्हणाले.
मोदी खोटारडै
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या कार्यक्रमातही खोटे बोलले. शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे दोन वर्षांपासून पडून आहे. सरकार तो मंजूर करीत नाही. मात्र हे लोक केवळ महिला सुरक्षेच्या गप्पा मारतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी योजनांबद्दल बोलले. पण मोदींनी शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणतो. भाजपला शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. लखपती दीदी ही योजनाही फसवी आहे, असे पटोले म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
महिलांना आधीपासूनच एक लाख रुपयांचे कर्ज मिळत होते. ही कर्ज मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे. परंतु त्यासाठीही प्रचंड अटी आहेत. त्यामुळे या योजनेचा फायदा नाही. केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली. तशीच राज्यातही ही योजना लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांचाच पैसा कपात करुन त्यांना दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आहे. मात्र सुधारित योजनस ही कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे, असा आरोपही पटोले यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण आहे. हा महामार्ग केवळ ठेकेदारांसाठी आहे. कोकणच्या लोकांना याचा फायदा नाही. ठेकेदारांना पैसे मिळावे म्हणून रस्त्याचे काम रखडविण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री तेथे इव्हेंटबाजी करीत असल्याचे पटोले म्हणाले.