महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : जातीचे बीज पेरले तर विकासाचे फळ कसे मिळेल?

Assembly Election : ‘कास्ट बेस व्होटिंग’वर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

 BJP News : एखाद्या मतदारसंघाचा विकास होत असताना तेथे जातीचे राजकारण आणणे योग्य नाही. जातीच्या आधारावर जर बीज पेरले गेले तर विकासाची फळे कशी चाखता येतील, असा प्रश्न राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विकासाची कामे कोण करतो यापेक्षा कोण जवळच्या जातीचा आहे, याचा विचार जेव्हा समाज करायला लागतो, तेव्हा मोठी गडबड होते, असा संदेश मुनगंटीवार यांनी यावेळी अनेकांना दिला.

वरोरा तालुक्यातील माढेळी येथे ताराचंद हिकरे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. विकासाची कामे करताना आपण कधीही भेदभाव केला नाही. पण कधी कधी लोक अपप्रचाराला बळी पडतात. परंतु लवकरच नागरिकांना विधानसभा निवडणुकीतून पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर योग्य ती निवड करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी मतदारांनी सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले. आपण राज्यात अर्थमंत्री होतो. विकास कामांसाठी लागणारा निधी सरकारी तिजोरीतून येतो. या तिजोरीचा कोड नंबर आजही आपल्याला पाठ असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

विकास खोळंबतो

केवळ जातीच्या नव्हे तर विकासाच्या आधारावर मतदान करा. मतदान करताना हा उभा असलेला उमेदवार विकास करण्यास सक्षम आहे की नाही, सक्षम असेल तरच मतदान करा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

सावध रहा 

माढेळी, नागरी येथील पिण्याच्या पाण्यासह अन्य प्रश्नही लवकरच सोडविण्यात येतील. आपण नागरिकांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांपैकी आहोत. त्यांचे आरोग्य जपणाऱ्यांपैकी आहोत. मात्र काही जण या शुद्ध पाण्याचा वापर करून वेगळेच काही पिण्याचे सवय लोकांना लावत असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. अशा लोकांपासून सावध राहा, असेही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेस आमदार निरुत्तर

मुलमध्ये काँग्रेसचे आमदार आपल्याला भेटले. चांगल्या दर्जाचे रस्ते पाहिल्यानंतर त्यांनी प्रश्न केला. त्यावेळी आपण त्यांना उत्तर दिले. काही वर्षांपूर्वी आपणच त्यांच्या घरासमोरचा रस्ता केल्याची आठवण त्यांना करून दिली. रस्ते आणि मूलभूत सुविधा म्हणजे विकासाचा महत्वाचा टप्पा आहे. परंतु काही जण केवळ विरोध करतात. अशा विरोधकांच्या नादी लागू नका. अन्यथा विकासापासून वंचित राहाल, असे आवाहन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!