महाराष्ट्र

Chandrapur MP : खासदारांच्या भावालाही लागले आमदारकीचे डोहाळे !

BJP Leader : विजय वडेट्टीवार गटाचे डॉक्टर हेमंत खापणे यांचीही फिल्डिंग 

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ यायला लागली आहे, तसतशी चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्याच मतदारसंघांमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू झालेली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे जे की बॅनरवरील सामाजिक कार्यकर्ते आणि खासदारांचे भाऊ एवढेच ज्यांचे पॉलिटिकल क्वालिफिकेशन आहे, त्यांनाही सध्या आमदारकीचे वेध लागल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघांमध्ये वरोरा विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघामध्ये वरोरा आणि भद्रावती अशा दोन तालुक्यांचा समावेश आहे. विधानसभेचा पूर्व इतिहास पाहू जाता 2009 मध्ये या विधानसभेतून काँग्रेसचे संजय देवतळे यांनी 51,904 मतं घेत तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा 3,740 मतांनी पराभव केलेला होता.

एकनिष्ठ नाहीत

2014 च्या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत 53,877 मते मिळवून तेव्हाच्या भाजपवासी झालेल्या संजय देवतळे यांच्यावर 2,004 मतांनी विजय मिळविला होता. तर 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रतिभा धानोरकर यांनी 63,862 मते मिळून शिवसेना पक्षाचे संजय देवतळे यांचा 10,197 मतांनी पराभव केला होता. ही आकडेवारी आणि बदलते पक्ष त्यामुळे वरोरा विधानसभा ही कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कधीच राहिलेली नाही. तर इथले नेतृत्वही कोणत्याही एका पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नाहीत हे दिसून येते.

या पृष्ठभूमीवर 2024 ची विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आणि गेम चेंजर म्हणून ज्यांची ओळख होती, असे बाळू धानोरकर हे आज राहिलेले नाहीत. तर काँग्रेसचे सर्व सूत्र त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्याकडे घेतलेले आहेत. म्हणूनच खासदारांचे भाऊ या एकमेव कौटुंबिक नात्याचा लाभ आणि खासदारांच्या पहिल्याच आंदोलनात अधिकाऱ्यांच्या कानशीलाखाली वाजविणाऱ्या प्रवीण काकडे यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे आणि म्हणून काँग्रेसतर्फे बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर जे भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते, तेही या स्पर्धेत आहेत. शिवाय काँग्रेसतर्फे मराठा सेवा संघाशी चांगलाच घरोबा असलेलं डॉक्टर चेतन खुटेमाटे हेही सध्या ठीकठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटपाच्या कार्यक्रमातून जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेक नेते इच्छुक

डॉक्टर विजय देवतळे हेसुद्धा या स्पर्धेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद आहे. काँग्रेसने यांना थोडंसं बाजूला सारलं असलं तरीही डॉक्टर विजय देवतळेसुद्धा आज काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत व तसे त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. विजय वडेट्टीवार गटाचे डॉक्टर हेमंत खापणे यांनीसुद्धा फिल्डिंग लावलेली आहे.

भाजपकडून गोंडवाना विद्यापीठाची सिनेट सदस्यत्वाची जागा मिळविणारे चंद्रपुरातील इन्स्पायर एज्युकेशनचे संचालक प्राध्यापक विजय बदखल अखेरच्या क्षणी काँग्रेसचे उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या एकूणच रणनीतीचा मुख्य भाग असलेले प्राध्यापक बदखल धनोजे कुणबी समाजाचे आहेत. हा मतदारसंघ कुणबीबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो . त्यामुळे अखेरच्या क्षणी प्राध्यापक विजय बदखलही प्रतिभा धानोरकर यांचे विश्वासू म्हणून उमेदवारीच्या स्पर्धेत बाजी मारतील, अशी चर्चा आता जोर धरते आहे.

एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळविल्यामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाचा फायदा घेत इथे पक्षप्रवेश करून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी काही दिग्गज तयारीत आहेत. पक्षाचे जुने कार्यकर्तेसुद्धा जे आज चांगल्या पदांवर आहेत त्यांनासुद्धा आता या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले भाग्य आजमाविण्याची चांगलीच घाई झालेली दिसते. या सर्व घडामोडींकडे पाहू जाता या विधानसभा निवडणूकित काँग्रेस पक्ष बाजी मारेल का, की नेहमीप्रमाणे वेगळे नाव वेगळ्या पक्षाशी जुळून वेगळाच उमेदवार यशस्वी होईल, याकडे आता वरोरावासियांचे लक्ष लागलेले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!