प्रशासन

Chandrapur : ई निविदा प्रक्रियेमधील अनियमितता भोवली !

E tender process : उर्जानागरचे सरपंच व उपसरपंच अपात्र, सदस्यत्व ही रद्द  

Declared Ineligible : चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा नगरचे सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आलेले आहे. या घटनेमुळे ऊर्जानगर ग्रामपंचायत आणि ऊर्जानगर वसाहतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ई निविदा प्रक्रियेमध्ये करण्यात आलेली अनियमितता आणि ग्रामसभेला वेळेवर उपस्थित न राहिल्याने अतिरिक्त आयुक्त, नागपूर यांनी ग्रामपंचायत ऊर्जानगरचे सरपंच व उपसरपंच या दोघांनाही दोषी ठरवत त्यांना तातडीने पदावरून हटवले आहे. याशिवाय या दोघांचे सदस्यत्वही काढून घेण्यात आले. त्यामुळे ऊर्जानगरमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आता ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार की नवीन सरपंच निवडला जाणार , याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ऊर्जानगरचे सदस्य राजकुमार डोमकावळे यांनी सरपंच मंजुषा येरगुडे व तत्कालीन सचिव यांच्या विरोधात ऊर्जानगरमधील ई-निविदा प्रक्रियेत होत असलेल्या अनियमितता आणि मे 2022मध्ये ग्रामसभा न घेतल्याबाबत लेखी तक्रार केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे लिखित स्वरूपात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते की, या अनियमिततेसाठी सरपंच व उपसरपंच दोघेही दोषी आहेत.

ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 नुसार कारवाई करून सचिवाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आहे. ग्रामपंचायत सदस्य राजकुमार डोमकावळे यांच्या मागणीवरून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सविस्तर चौकशी केली. ई-निविदा प्रक्रियेत अवाजवी अटी लादणे आणि विशिष्ट व्यक्तीला लाभ मिळवून देणे, यांसारखे प्रकार स्पष्टपणे समोर आले.

Narendra Modi : निवडणुकीपूर्वी पंतप्रधान महाराष्ट्रात

या प्रकरणात सरपंच, उपसरपंच आणि सचिवांची भूमिका संशयास्पद आढळली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार तिघेही दोषी आणि कारवाईस पात्र असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रथमदर्शनी आढळले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 (1) अनुसार एका वित्तीय वर्षात चार ग्रामसभा घेणे हे प्रत्येक ग्रामपंचायतीला अनिवार्य असते . आर्थिक वर्षातील मे २०२२ मध्ये ग्रामसभा व्हायला हवी होती. परंतु ही सभा झालेली नाही, असे आढळून आले. अशा प्रकारे, प्रथमदर्शनी, ते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार कारवाईस पात्र आहे.

अहवाल नागपूर विभागात

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा तपास अहवाल 29 डिसेंबर 2023 रोजी अतिरिक्त आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांना पाठवला होता. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही पक्ष आणि विरोधी पक्षांकडून अतिरिक्त आयुक्तांना कागदपत्रे सादर केली जात होती आणि दोन्ही बाजू आपापल्या विजयाचा दावा करत होत्या. दरम्यान लोकसभा निवडणुकीमुळे हे प्रकरण बरेच लांबले होते. 23 ऑगस्ट रोजी मुख्य अर्जदार राजकुमार डोमकावळे यांना आपण ही केस जिंकलो असल्याचे कळले.

नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.माधवी खोडे-चावरे यांनी अर्जदाराच्या अर्जाला मान्यता दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी 29 डिसेंबर 2023 रोजी तपास अहवाल स्वीकारला. तर बिगरअर्जदार सरपंच मंजुषा शेषराव येरगुडे व उपसरपंच अंकित चिकटे यांना पुढील कार्यकाळापर्यंत पद व सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.

सरपंचाच्या हाती कमान

उर्जानगरमध्ये एकाच वेळी दोन्ही पदे रिक्त असल्याने आता सरपंच निवडीपर्यंत केवळ प्रशासकच सरपंच पदाचा कारभार पाहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सरपंच निवडणूक कधी होणार? होणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. उर्जानगर ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्य आहेत. सरपंच व उपसरपंच यांचे पदांसह सदस्यत्व गेल्याने आता 15 सदस्य उरले आहेत. सरपंच होण्यासाठी एकूण 8 सदस्यांची आवश्यकता आहे . त्यामुळे आता सरपंचपदासाठी निवडणूक होईल की प्रशासक बसेल, हे लवकरच पाहणे औत्स्युक्याचे असणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!