Mahad : एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा, संवेदना मेलेल्या आहेत, अशी बोचरी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ आयोजित ‘जाणीव जागर’ या कार्यक्रमात केली.
महिला अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भुमिका उघड करायची आहे. त्याच उद्देशाने बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय देण्यासाठी भाजपने आज जाणीव जागर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूरच्या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. लाडकी बहीण योजनेला मिळत असलेला प्रतिसाद बघून त्यांनी बंदचे आवाहन केले. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसचे लोक धास्तावले. त्यातूनच त्यांनी बंदचे आवाहन केले होते,’ असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मणिपूर होतोय की काय असे भाकीत शरद पवारांनी वर्तवले होते. त्यामुळे राज्यात अशांतता, सामाजिक असुरक्षितता पसरतेय. हा केवळ योगायोग आहे की नियोजित डाव आहे? यांच्या हिंसक प्रवृत्ती निर्माण करण्याला महाराष्ट्रातील जनतेने बळी पडू नये, असे आवाहन दरेकर यांनी केले. दरेकर पुढे म्हणाले की, कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला त्याचा साधा निषेध ठाकरेंच्या पक्षाने, काँग्रेस किंवा शरद पवार गटाने केला नाही. बदलापूरची झालेली घटना दुर्दैवीच आहे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही. परंतु सरकारने सर्व प्रकारच्या ताकदीने कारवाया केल्या आहेत. आरोपीला अटक केली. अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आरती सिंग या आयजी दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी आहेत त्यांचे विशेष तपास पथक नेमले. ज्यांनी कसाबला फाशी देण्यास भाग पाडले त्या उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. परंतु, याचे राजकारण या नालायक महाविकास आघाडीला करायचे आहे, असा आरोपही दरेकरांनी केला.
तेव्हा संवेदना कुठे गेल्या होत्या
उद्धव यांना एवढ्या संवेदना असत्या तर निर्भया निधीसाठी जी वाहने घेतली होती ती या मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेच्या ताफ्यासाठी वापरली नसती. विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई यांनी ही वाहने स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरली. दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही निर्भयाचे वाहन होते. तेव्हाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण आम्ही कधी आंदोलन, राजकारण केले नाही, असेही दरेकर म्हणाले.
‘लाडकी बहीण’ने झोड उडवली
दरेकर यांनी २००४ ते २०१४ युपीएचे सरकार असताना घडलेल्या घटनांचा पाढा वाचला. ‘एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण अशा पद्धतीने करायचे हे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा, संवेदना मेलेल्या आहेत. एवढ्या घटना घडल्या, पण आम्ही कधीच त्याचे राजकारण, आंदोलन केले नाही. अशा गोष्टींचा आपल्या राजकीय लाभासाठी उपयोग करायचा नसतो हे महाविकास आघाडीतील नेत्यांना कळत नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने यांच्या झोपा उडल्या आहेत. त्यामुळे बेताल आणि दिशाहीन झाल्यासारखे वागत आहेत, अशी अशी टीकाही दरेकरांनी केली.