Police Action : शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आत्महत्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. मात्र वर्षा बंगल्यावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, तुपकर यांच्या पाळतीवरही गुप्तचर पोलिस होते. ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांना अटक केली.
दरम्यान, काही शेतकर्यांनी पोलिसांना गुंगारा देत ‘वर्षा’ बंगल्याऐवजी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले. पोलिसांनी शेतकर्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना ऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची सूचना केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकर्यांच्या विविध मागण्यांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांना दरवाढ देण्यात यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते शुक्रवारी सकाळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पण त्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना चर्चगेट येथून त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले.
पोलिसांची ही कृती सरकारला महागात पडेल, असा इशारा तुपकर यांनी दिला. मरीन लाईन्स पोलिसांनी मला ताब्यात घेतले आहे. आता ते कुठे नेतात हे बघू. तूर्त ही कारवाई सरकारला महागात पडेल, असेही ते म्हणाले होते. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता. रविकांत तुपकर यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने सोयाबीनला ९ हजार, तर कापसाला १२ हजार रुपये दर द्यावा. तसेच शेतकरी कर्जमाफी पीक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यांत जमा करावी, असे ते म्हणाले होते. पोलिसांनी त्यांना सध्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात हलविले आहे. त्यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
पुन्हा रस्त्यावर उतरेन
पोलिसांनी अटक केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. सरकारने आज मला बेकायदेशीरपणे अटक केली. सरकार आमच्या चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. येथे इंग्रजांचे राज्य नाही. ही लोकशाही आहे ही बाब मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. तुम्ही मला अटक केली हरकत नाही. मला कुठेही न्या. पण मी जेव्हा बाहेर येईल, तेव्हा महाराष्ट्रातील सगळा शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसल्याशिवाय राहणार नाही, असे तुपकर म्हणाले.