एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पुणे येथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आले आहे.
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पुणे येथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी असलेली आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. रविवार, दि. २५ अॉगस्टला या परीक्षा होणार होत्या. यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्यांची अडचण होईल, असे सांगण्यात आले. शिवाय एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश करण्यात आला नाही, याबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. या एकूणच निर्णयांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आक्रमक आंदोलन केले.
या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवारांसह इतरही नेत्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर आंदोलन तीव्र होताना दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सरकारला आणि एमपीएससीला इशारा दिला होता. निर्णय झाला नाही तर मी स्वतः आंदोलनास सामील होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानंतर एमपीएसीने आंदोलनाची दखल घेत गुरुवारी (दि.२२) तातडीची बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय येईल, असे सर्वांना वाटले होते. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. एमपीएससी अध्यक्षांना परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर आयोगाने बैठकीमध्ये सर्व शक्यतांचा विचार केला. आणि अखेर पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला.
आंदोलनाला यश
राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट कराव्यात, या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तर शरद पवारांसह इतर विरोधकांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी सरकारला मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससी अध्यक्षांना विनंती केली. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. आंदोलनाला यश आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.