महाराष्ट्र

Chandrapur MNS : राज ठाकरेंनी घोषित केले दोन उमेदवार

Raj Thackeray : चंद्रपूर, राजुऱ्यातून मनसे लढणार विधानसभा

Maharashtra Assembly Election : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 22 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील स्थानिक एनडी हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभानिहाय आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी चंद्रपुरातील माजी नगरसेवक सचिन भोयर हे दोन उमेदवार मनसेकडून विधानसभा निवडणूक लढतील, असे घोषित केले.

पदाधिकाऱ्यांची बैठक संपली आणि राज ठाकरे हॉटेलमधून रवाना झालेत. त्याचवेळी राजुरामधून सचिन भोयर यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव चंद्रशेखर बोरकर यांनी चांगलाच राडा घातला. त्यामुळे भोयर-बोरकर या दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी, धक्काबुक्की झाली. या घटनेत चंद्रशेखर बोरकर जखमी झालेत. या राड्यामुळे चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेमध्ये मनसेचे उमेदवार आताच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ट्रॅकवर येण्यापूर्वीच ‘रेड सिग्नल’

विदर्भात मनसेचे इंजिन अद्यापही ट्रॅकवर सुसाट धावलेले नाही. मनसेची स्थापना झाल्यापासून अनेक वर्षांनंतर राज ठाकरे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काही इच्छुकांच्या चांदा ते मुंबई या आमदारकीच्या गाडीला मंजुरी दिली. पण चंद्रपुरात त्याची गाडी माझ्या गाडीच्या आधी फलाटावरून सुटतेच कशी, हे पाहून घेतो या आविर्भावात झालेल्या राड्यामुळे निवडणुकीच्या ‘हायस्पीड ट्रॅक’वर येण्यापूर्वीच चंद्रपुरात मनसेच्या इंजिनला ‘रेड सिग्नल’ मिळणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

राजुरा विधानसभा मतदार संघाकरिता सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर होताच चंद्रशेखर बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे भोयर हे पक्षााच्या ‘तिकिट काऊंटर’वर पोहोचण्यापूर्वीच ‘चेन पुलिंग’ला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

सचिन भोयर यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी घोषणाबाजीदरम्यान करण्यात आली. सचिन भोयर यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार उभा करू, असा इशाराही चंद्रशेखर बोरकर यांनी दिला.

राज ठाकरेंची पलटी

मुरली अॅग्रो सिमेंट कंपनीत आंदोलन केले, तेव्हा सर्व कामगार जेलमध्ये गेले होते. त्यावेळी सचिन भोयर कुठे होते? असा सवाल करीत शिक्षा भोगणाऱ्याला व्यक्तीला उमेदवारी नको, असे नमूद करण्यात आले. काम न करता नुसती बॅनरबाजी करणाऱ्या सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर झालीय, असा संताप बोरकर यांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याला आपण स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी आपल्याला स्वतः राज ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र अचानक राज ठाकरे यांनी सचिन भोयर यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे बोरकर यांना चांगलाच धक्का बसला. यातूनच सभास्थळी राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचा आदेश देऊन राज ठाकरे चंद्रपुरातून ‘डिपार्ट’ झालेत. परंतु विधानसभेसाठी रवाना होणाऱ्या ‘ट्रेन’मध्ये चढण्यास इच्छुक असलेले बोरकर यांच्यासारखे कार्यकर्ते चंद्रपूरच्या फलाटावरच सुटले. त्यांच्याकडे ना मनसेच्या ‘इंजिन ड्रायव्हर’ने लक्ष दिले ना गार्डने. त्यामुळे बोरकर आता राज ठाकरे यांच्या आदेशालाच धुडकावून लावण्याच्या तयारीत दिसत आहेत. महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, बंडखोरांची बिघाडी असे त्रांगणे निवडणुकीत होणार आहे. त्यातच मनसेने ‘एकला चलो रे..’चा नारा दिला आहे. अशात ‘वेटिंग लिस्ट’मध्ये असलेल्या आणि ‘कन्फर्म तिकिट’ मिळेल या अपेक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी ‘फायनल रिझर्वेशन चार्ट’ लावताना चांगलाच हिरेमोड केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!