cheating : नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्रहारचे पदाधिकारी असलेल्या पिता- पुत्रासह तीन जणांविरुद्ध बाळापुर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. प्रहार उपजिल्हाप्रमुख अरविंद वानखडे पाटील, मुलगा श्रीकांत अरविंद वानखडे पाटील आणि बिर्ला गेट अकोला येथील रहिवासी मनीष मुरलीधर लंके अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून पारस औष्णिक विद्युत केंद्रामध्ये नोकरीवर लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लाखो रुपयांची फसवणूक
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार मधील अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी असलेले प्रहार उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील वानखडे, त्यांचे पुत्र प्रहार विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत अरविंद पाटील यांनी बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक केंद्रात नोकरी लाऊन देण्याचे आमिष देऊन लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी आणि इतर नऊ ते दहा सुशिक्षित बेरोजगारांना पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे मजूर म्हणुन नोकरीवर लाऊन देण्याचे खोटेनाटे आमिष देऊन आमच्याकडुन प्रत्येकी रुपये एक लाख घेऊन आमचा विश्वासघात केला. फसवणुक केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे
25 मे 2020 रोजी ही फसवणूक झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेव्हापासून उडवाउडवीची उत्तरे देत या तिघांनी वेळकाढू धोरण स्वीकारले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अखेर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर अब्दुल गुफरान अब्दूल गफार याने बाळापूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक अनिल जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
प्रहारवर लक्ष
पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात नोकरी लावून देण्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आमदार बच्चू कडू यांच्या नावाचा वापर झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात आता प्रहार किंवा स्वत: बच्चू कडू हे कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडै राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नावाचा वापर करीत आणखी कोणाची फसवणूक झाली आहे काय, याचा तपासही पोलिसांना आता करावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ नऊ ते दहा युवकांपुरतीच आहे की आणखी मोठी आहे, हे पोलिसांना शोधावे लागणार आहे.