Vidarbha Visit : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष यात्रांच्या किंवा भेटीगाठींच्या माध्यमातून मतदारसंघांची चाचपणी करत आहे. संभाव्य उमेदवारांचा अंदाज घेण्याचेही काम सुरू झाले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर राज यांचे इंजिन आज (गुरुवार, दि. २२) चंद्रपूरमध्ये धडकणार आहे. दुपारी अडिचच्या सुमारास राज यांचे चंद्रपुरात आगमन होईल.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी भाजपला समर्थन देत असल्याचे राज यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, ते आधीच कामाला लागले आहे. मनसे स्वबळावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार की महाआघाडी किंवा महायुतीत सामील होणार, हे वेळच सांगेल. पण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे याची चर्चा मात्र नक्कीच होत आहे.
सर्व्हेक्षणानंतरचा दौरा
राज ठाकरे यांचे आज दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन होईल. जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसेने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूणच राजकीय परिस्थितीचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर मनसेच्या पक्ष निरीक्षकांनी चंद्रपुरात येऊन सर्व विधानसभा मतदारसंघांना भेटी दिल्या. संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली होती. त्यानंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा होत आहे. यावेळी सर्व सहा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार, सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भेट आपुलकिची!
प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. यावेळी जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मनसेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मनदिप रोडे आणि राहुल बल्लमवार यांनी या चंद्रपूर दौऱ्यासाठी बरीच परीश्रम घेतले आहेत. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या मेहनतीला काय बक्षीस देतात याकडेही आता चांद्रपुकरांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून मनदिप रोडे हे सुद्धा ‘भेट आपुलकीची’ या माध्यमातून स्थानिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिवाय समाजमाध्यमांवर देखील बरेच सक्रिय झाले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
राज ठाकरे गडचिरोलीवरून चंद्रपूर येथे येणार आहेत. स्थानिक एनडी हॉटेलमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विधानसभानिहाय आढावा घेण्यात येईल. राज यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.