Vidarbha Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी गोंदियात आल्यावर प्रशासनावर टीका केली. मनसे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या आहे. व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी गोंदियात मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले आहे. राज ठाकरे म्हणाले, कोणताही पक्ष सुरुवातीला लहानच असतो. तो प्रस्थापितांशी लढूनच वर येतो, असे म्हणत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय होण्याचे आवाहन दिले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात फक्त काँग्रेस पक्ष प्रस्थापित होता. त्याविरुद्ध लढूनच इतर पक्षांनी आपली वाटचाल सुरू केली आणि बळकट झाले आहेत. इतर झाले तसेच आपल्याला पण आजच्या प्रस्थापितांविरुद्ध लढूनच पुढे यावे लागणार आहे. कुणी संधी देणार नाही. संधी हेरून घ्यावी लागणार आहे. याकरिता पक्षाचा संघटनात्मक गाभा म्हणजेच की, शेवटच्या माणसांपर्यंत स्थानिक जिल्हातील पदाधिकाऱ्यांनी पोहोचणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगितले.
तिकीट वाटपाचा फॉर्मूला
पुढील दोन महिन्यांत गोंदियातील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष इथपर्यंत तुमची यंत्रणा गेलेली मला दिसून आली तरच मी गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा लढवणार. नाही तर इतर पक्षांकडून सेटिंग करून पैसे कमवायला मी कुणालाही निवडणुकीची तिकीट देणार नाही, असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले. पुढील महिन्यात पक्षातील इतर पदाधिकारी तुम्ही केलेली पक्ष बांधणी बघायला येणार असल्याचे ठाकरेंनी गोंदियातील पदाधिकाऱ्यांना सांगितले. प्रत्येक नियुक्त केलेला माणूस प्रत्यक्ष दाखवावा लागणार आहे. यातून मला समाधान झाले तरच पुढची वाटचाल सोईस्कररित्या करता येईल, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसेकडून जनतेच्या अपेक्षा
आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचे शासन जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे आता जनता बदल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्हयातील गावोगावी, घराघरापर्यंत पोहोचविण्याकरीता प्रत्येक मनसैनिकांनी आजपासूनच सज्ज व्हावे लागणार आहे. पुढील 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका अपेक्षित असल्यामुळे वेळ कमी उरलेला आहे. पण या कमी वेळातच अधिक गतिने प्रत्येक मनसैनिकाला धाव घ्यावी लागणार आाहे.
पुढील दोन महिन्यांत आपण केलेल्या कर्तबगारीमुळे आपण यशा पर्यंत जरी पोहोचलो नाही तरी जवळपास पोहोचू, असा विश्वास व्यक्त करित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार गोंदिया जिल्ह्यातील घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी याप्रसंगी केले. व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे, गोंदिया जिल्हा संघठक रितेश गर्ग, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, मन्नु लिल्हारे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.