आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या कामाला लागली आहे. पण यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. मनसेही आता पूर्ण ताकदिने मैदानात उतरला आहे. दरम्यान मराठवाड्यानंतर आता विदर्भ पिंजून काढण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे गोंदियाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज (बुधवार) त्यांचे गोंदियात आगमन होत आहे. पण मुंबईतूनच प्रचार करत ते विदर्भाच्या दिशेने निघाले आहेत.
मुंबईहून गोंदियात येण्यासाठी विमानसेवा उपलब्ध असताना देखील त्यांनी रेल्वेने गोंदियात येण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे मुंबईपासूनच आपल्या पक्षाचे चिन्ह (इंजिन) घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, अशी चर्चा रंगत आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याने राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. नुकताच मराठवाडा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर संध्याकाळी भंडारा जिल्हात मुक्काम आहे. या दौऱ्यादरम्यान पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करणार आहेत.
विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रफुल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात राज ठाकरेंच्या दोऱ्याला सुरुवात होणार आहे. तसेच राज ठाकरे भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्याने ते येथे नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
भंडारा-गोंदियाचे उमेदवार घोषित करणार?
राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त विदर्भातील काही जागांवर मनसेचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ज्या विधानसभा जागांवर सक्षम उमेदवार दौऱ्यानिमित्ताने राज ठाकरे घोषित करणार अशी माहिती पुढे आली आहे. मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरे यांनी राज्यातील चार जागांवर आपले उमेदवार घोषित केले होते. त्यामुळे भंडारा-गोंदियासह विदर्भातील 62 जागांपैकी किती विधानसभांवर उमेदवार राज ठाकरे घोषित करतात, हे आता या दौऱ्यानिमित्ताने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
असा असेल राज ठाकरेंचा विदर्भ दौरा
मंगळवार 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजता गोंदिया रेल्वे स्थानक
दुपारी दीड वाजता गोंदिया शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
सायंकाळी सहा वाजता भंडारा शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकारी यांची बैठक
बुधवारी 22 ऑगस्ट रोजी अकरा वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
दुपारी अडीच वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकाऱ्यांची बैठक
शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वणी यवतमाळ येथे पदाधिकारी व निरीक्षकांची बैठक
सायंकाळी सहा वाजता वर्धा शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
शनिवार 24 ऑगस्ट रोजी दहा वाजता नागपूर रविभवन येथे पत्रकार परिषद
अकरा वाजता रवीभवन शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकारी यांची बैठक
सायंकाळी पाच वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
रविवार 25 ऑगस्ट दुपारी बारा वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
दुपारी साडेतीन वाजता अकोला विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकाऱ्यांची बैठक
सोमवार 26 ऑगस्ट रोजी एक वाजता पातुर,बाळापूर मार्गे शेगाव मंदिर दर्शन व पदाधिकाऱ्यांची बैठक
सायंकाळी साडेनऊ वाजता रेल्वेने शेगाव हून मुंबई करता रवाना होतील