Gram Sabha : भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या इच्छेला अड्याळवासियांचा आक्षेप असल्याचे समोर आले आहे. अड्याळ नगरपंचायत स्थापनेला ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला गेला आहे. भंडारा पवनी तालुक्यातील अड्याळ येथे 14 ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा गावातील विविध मुद्यांवरून गाजली.
ग्रामस्थांनी विविध महत्त्वाचे निर्णय ठराव स्वरुपात घेतले. ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाने गेल्या आठ वर्षांपासून ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत घालणे, गावातून जाणारा महामार्ग, पादचारी मार्गावर असलेले अतिक्रमण तत्काळ हटविणे, गावात असलेली दारू भट्टी गावाच्या बाहेर नेणे आदी मुद्दे चर्चेचे ठरले.
नुकताच शासनाने जाहीर केलेल्या अड्याळ नगरपंचायतला ग्रामसभेत आक्षेप नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी शेती देण्यासही विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांनी आपली मते, समस्या मांडली. पुनर्वसनात जाणारी शेती देणे ग्रामस्थांनी नाकारले. नुकतेच शासनाने अड्याळला नगरपंचायत घोषित केले. या संदर्भात शेकडो ग्रामस्थांनी सह्यांनिशी आक्षेप नोंदविला. गावाच्या सर्वेक्षण दुरुस्तीची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
दूसरीकडे चकारा मार्गावरील अतिक्रमण हटवून तिथेच पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक वर्षांपासून प्रत्येक गल्लीबोळात रस्ते, नाल्यांचे विद्रूपीकरण करून ठेवणारे कंत्राटदार यांना जिल्हा प्रशासनाने काळ्या यादीत घालण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला गेला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी घरे बांधली, परंतू निधी नसल्याने लाभ मिळाला नाही. हा लाभ तत्काळ मिळावा, असाही ठराव यावेळी घेण्यात आला. यावेळी सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे, ग्रामविकास अधिकारी साखरे व सदस्य तथा ग्रामस्थ उपस्थित होने.
अड्याळ तालुक्याचा पडला विसर
अड्याळ वासियांनी नगरपंचायतच्या स्थापनेवर आक्षेप नोंदवला. दरम्यान अनेक वर्षापासून अड्याळ तालुका व्हावा ही मागणी नागरिक करीत आहेत. अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी अड्याळवासी रेटून लावत होते. अड्याळवासियांनी मुंबई मंत्रालय गाठण्यापर्यंत मजल मारली. यासाठी अनेक आंदोलन सुद्धा झाली. मात्र त्यांची ही मागणी अद्याप पडीत आहे. तालुका झाला तर ग्रामपंचायतच्या जागी नगरपंचायत होणे स्वाभाविक आहे. असे असताना एकीकडे अड्याळ तालुका व्हावा ही मागणी रेटून धरणे आणि दुसरीकडे अड्याळ नगरपंचायतला विरोध करणे या दोन्ही विरोधाभासी घटना घडत आहेत. त्यामुळे नेमके त्याचे परिणाम काय होणार, याची उत्सुकता लागलेली आहे.