Statement Of Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस हे अडथळा असल्याचे विधान केले होते. काँग्रेसने जरांगे यांचा हा आरोप योग्य असल्याचे विधान केले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी जरांगे यांच्या या विधानात तथ्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात होते. त्यावेळी आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी हे आरक्षण दिले होते, असे पटोले म्हणाले.
चव्हाण मुख्यमंत्री असताना मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधात फडणवीस यांचे नीकटवर्तीय कोर्टात गेले होते, असा आरोप पटोले यांनी केला. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस यांनी सांगितले होते. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही बाब जाहीरपणे सांगितली आहे. गुणरत्न सदावर्ते हे फडणवीस यांचे नीकटवर्तीय आहेत. सदावर्ते हेच आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले होते.
जनतेशी खोटारडेपणा
फडणवीस हे जनतेशी खोटे बोलत आहेत. आरक्षणप्रश्नी ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. भाजपला आरक्षणाचा प्रश्न चिघळवत ठेवून सत्ता भोगायची आहे. ‘फोडा व राज्य करा’ ही ब्रिटिशांची नीती होती. हिच नीती आता भाजपने स्वीकारली आहे. फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला होता. फडणवीस सरकार असतानाच विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठरावही पास करण्यात आला होता. पण नंतर ते कोर्टात टिकू शकले नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सरकार जो निर्णय घेईल त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. हे महाविकास आघाडीने आधीच स्पष्ट केले आहे. अशात महायुतीचे सरकार विरोधकांवरच आरोप करत आहे, असे पटोले म्हणाले.
केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे थेट आरक्षण देण्याचा अधिकार दोन्ही सरकारकडे आहे. असे असतानाही दोन्हीकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही पटोले यांनी भाष्य केले. लाडकी बहीण योजना ही सरकारला निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे. सरकार कर्जात बुडालेले आहे. त्यामुळे एकदा सत्तेवर आल्यावर योजना बंद करून टाकू, असा त्यांचा डाव आहे. दोन वर्ष त्यांना बहीण आठवली नाही. केवळ उद्योगपती आठवत होते. लोकसभा निवडणुकीत जनतेने धक्का दिल्याने त्यांना बहीण आठवली. मतं दिली नाही तर योजनेचे पैसे परत घेऊ अशा धमक्या देत आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.