Chandrapur News : विजय वडेट्टीवार हे सर्वांना घेऊन चालणारे अतिशय धाडसी , तडफदार नेते आहेत. याशिवाय ते विरोधी पक्षनेते असल्यामुळे आमच्या दृष्टीने आमच्या बाजुने ते आमचे मुख्यमंत्रीच आहेत, असे सूचक विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून विजय वडेट्टीवार यांचे नाव तर समोर येणार नाही ना? अशी चर्चाही आता जोर धरत आहे.
वडेट्टीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या अड्याळ टेकडी येथे 45 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या विपश्यना केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पडला. येथे तथागत बुद्ध मूर्ती वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी संवाद साधला. ब्रह्मपुरीजवळ असलेल्या अड्याळ टेकडी येथे आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्राध्यापक डॉ. फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा. फ्रामाहा सुपाचै सुयानो उपस्थित होते.
अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, खासदार डॉ. नामदेव किरसान, थायलंडचे कॅप्टन नटिकेट, अभिनेता गगन मलिक, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, अॅड. राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधीपक्ष नेता म्हणजे मुख्यमंत्रीच असतो, असे नमूद केले. मुख्यमंत्र्यानंतर विरोधी पक्षनेत्यालाच सभागृहात मान देण्यात येत असतो. विजय वडेट्टीवार यांच्या एकूणच कार्यशैलीवर त्यांनी स्तुती सुमनांची उधळण केली.
अनेकांच्या भुवया उंचावल्या
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या हौऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे वडेट्टीवार प्रबळ दावेदार तर राहणार नाही ना? अशी चर्चा आता जोर धरत आहे . उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे नमूद केले आहे. महाविकास आघाडीने नाव जाहीर केल्यास त्याला पाठिंबा राहील, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य हा सूचक इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मी जन्माने बौद्ध नसलो, तरी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची कास धरूनच आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांचे कार्य करीत असतो. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेली माणुसकीची व प्रेमाची शिकवण हिच जगाला शांतीचा संदेश देणारी खरी शिकवण असल्याचे ते म्हणाले. अड्याळ टेकडी येथील विपश्यना केंद्र सर्व धर्म, सर्व पंथातील नागरिकांसाठी मोलाचे ठरेल. मानवतावादी उच्च विचारांचे अधिष्ठान ठरेल. आगामी काळात हे स्थळ नावलौकिकास येईल. हे सत्कार्य करण्याची संधी बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात येथे जागतिकस्तरावरील धम्म परिषद घेता येईल, अशा सर्व सुविधांसह प्रशस्त व्यवस्था करून देण्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.