Inconvenience Of Villagers : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरत आहेत. अमरावती मधील मेळघाटातील अनेक गावात ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने डायरियाची लागण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने अनेक गावांमध्ये रुग्णा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक आरोग्य सुविधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. स्थानिक व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मुख्यत: पाणी पुरवठा विभागही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्याचे गांभीर्य अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असा संताप अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला. वानखेडे यांनी चुर्णी व हातरू येथील आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
हातरू आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांची खासदार बळवंत वानखेडे यांनी खरडपट्टी काढली. अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देत या भागात निरीक्षण करण्यास सांगितले. दूषित पाणी पिण्यात येऊ नये यासाठी उपाय करण्याची सूचना त्यांनी दिली. मेळघाट आणि इतर भागातील लोकांचे आरोग्य जपणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. सतत आजार वाढत असतील तर स्वच्छतेची काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात डास वाढवतात. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूची साथ पसरणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
व्यापक उपाय गरजेचे
चिखलदऱ्याचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना जलस्त्रोतांची स्वच्छता करण्याचे आदेश वानखेडे यांनी दिले. औषधांचा साठा त्यांनी तपासला. उपचार प्रणालीबाबत माहिती घेतली. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. जुलाब, उल्टी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णांचे हाल होता कामा नये, याकडेही लक्ष देण्यास वानखेडे यांनी सांगितले. मेळघाटातील आदिवासींना आवश्यक आरोग्य सेवा व शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेत. कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभाग यांच्याशी चर्चा केली. कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा कशा मिळतील याबाबत संवाद साधला. मेळघाटातील विविध गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आदेश दिलेत.
खासदार वानखेडे यांच्यासोबत माजी सभापती दयाराम काळे, माजी उपसभापती नानकराम ठाकरे, धारणीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, सहदेव बेलकर, राम चव्हाण, डॉ. मिलिंद चिमोटे, किशोर झारखंडे, पंकज मोरे, पीयूष मालवीय, जय झारखंडे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही विविध गावांना भेट दिली.