Wardha News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धेत आपल्या एका बहिणीला अशी ओवाळणी दिली की त्यांचे डोळे पाणावले. गडकरी यांच्या या बहीण आहेत डॉ. स्मिता कोल्हे. वर्ध्यात प्रा. सुरेश देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नितीन गडकरी येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यावर गडकरी सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे व रवी कोल्हे यांच्याकडे पोहोचले. करुणाश्रम येथे कोल्हे गडकरी यांची प्रतीक्षा करीत होते.
गडकरी करुणाश्रम येथे आल्यावर आश्रमचे आशिष गोस्वामी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात डॉ. कोल्हे यांनी गडकरी यांना राखी बांधली. ओवाळणी देण्यासाठी गडकरी यांनी खिसे तपासले. पण खिशात काहीच पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गडकरी यांनी बाजूलाच उभे असलेल्या गिरीश गांधी (Girish Gandhi) यांना विचारणा केली. त्यांनी गांधी यांच्याकडून काही रक्कम उसणे घेतली. त्यानंतर गडकरी यांनी डॉ. कोल्हे यांच्या ताटात ओवाळणी घातली. गडकरी यांनी ताटात ओवाळणी ठेवताच डॉ. कोल्हे यांचे डोळे पाणावले.
म्हणून वर्धेत रक्षाबंधन
डॉ. स्मिता कोल्हे व नितीन गडकरी शाळेत सोबतच शिकले. गेल्या 25 वर्षांपासून डॉ. कोल्हे या गडकरी यांना राखी बांधतात. डॉ. कोल्हे दरवर्षी गडकरी यांना नागपुरात राखी बांधतात. पण प्रकृतीमुळे आता जाणे शक्य नसल्याने त्यांनी वर्ध्यातच गडकरी यांना राखी बांधली. डॉ. कोल्हे यांच्यासह नागपुरातील गौरी चांद्रायण या देखील गडकरी यांना दरवर्षी राखी बांधतात. वर्धा येथे ज्या करुणाश्रम येथे रक्षाबंधन सोहळा झाला त्यासाठी डॉ. कोल्हे यांनी योगदान दिले आहे. आशिष गोस्वामी म्हणाले की, आश्रमासाठी जागा घेताना रक्कम कमी पडली. त्यावेळी डॉ. स्मिता कोल्हे यांनी डॉ. विलास डांगरे यांना विनंती करीत मदत मिळवून दिली.
करूणाश्रम हे नावदेखील डॉ. स्मिता कोल्हे यांनी ठेवले आहे. यावेळी गडकरी यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मुक्या प्राण्यांच्या भावना समजून घेतल्या जात आहेत. यासाठी होत असलेले कार्य अमोल आहे. यावेळी त्यांनी मोबाईलद्वारे पीपल्स फॉर ऍनिमल्स संघटनेच्या मेनका गांधी यांच्याशी संवाद साधत करूणाश्रमच्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेला गडकरी यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. याप्रसंगी बोर व्याघ्र प्रकल्पाचे ठेंगडी, पशू चिकित्सक डॉ. संदीप जोगे, पगडाल यांचा गडकरी यांनी सत्कार केला. गडकरी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.
डॉ.रवींद्र कोल्हे आणि डॉ.स्मिता कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड या दुर्गम गावातील आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा पुरवितात. त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने उभयतांना यापूर्वीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोल्हे दांपत्याचे कार्य आजही अविरतपणे सुरूच आहे.