लोकसभा निवडणुकीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या भूमिकेबाबत पक्षात नाराजीचा सूर आहे. परंतु, आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. यात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यावर अनके गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून ते माध्यमांच्या हाती लागले आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठविल्याची चर्चा होत आहे. या पत्रात केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत जालिंदर बुधवत यांच्यात आर्थिक मैत्री असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. बुलढाणा लोकसभेत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यामुळे पराभव पत्करावा लागला, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तर पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रमांमध्ये वारंवार अपमान केला जातो, त्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप या पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आता आपली खदखद व्यक्त करत असून यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा मोठ्या संख्येने पदाधिकारी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कुठल्याही पदाधिकाऱ्यांची माझ्या बाबतीत नाराजी नसून माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी अशी निनावी पत्रं पाठवली जात असल्याची प्रतिक्रिया जालिंदर बुधवत यांनी दिली आहे.
काय आहे पत्रात?
‘साहेब जय महाराष्ट्र…
आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आपणास नम्रपणे कळवू इच्छितो की, बुलडाणा जिल्हाप्रमुखर असलेले जालिंधर बुधवत यांच्यामुळे आपल्या पक्षाला अतोनात नुकसान झाले. त्याबाबत काही बाबी आपल्या निर्देशनास आणू इच्छितो.
लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा समन्वय नव्हता. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. कार्यकम व बैठकीच्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातो. जालिंधर बुधवत व प्रतापराव जाधव यांचे वैयक्तिक व आर्थिक संबंध आहेत. ही संघटना व्यक्तीगत मालकीची असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर त्यांची दहशद निर्माण करतात. त्यामुळे कार्यकर्ते घाबरून कोणीही त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही. पदाधिकारी कामकाजाबाबत बोलला तर त्याचे पद काढले जाते त्यांना पद काढल्याची धमकी दिली जाते. माझं कुणीही वाकडं करू शकत नाही. मी त्या पद्धतीचा खुटा वर रोऊन ठेवला आहे. अशा धमक्या दिल्या जातात.
पक्ष वाढविण्यासाठी कोणतेही लक्ष दिले जात नाही. फक्त ठेकेदारी च्या कामांकडे लक्ष देण्यात येते. कोणत्याही गावात शाखा उघडली नाही. फक्त कागदावरच संघटन झालेले आहे. लोकसभेमध्ये मिळालेले ३ लाख २० हजार 388 मते उध्दव साहेबांबद्दल असणाऱ्या प्रेम व सहानुभूतीमुळे मिळालेले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते थांबून घेण्याचे सांगत आहे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या दहशतीला कंटाळले आहेत.
.. तर अपमानास्पद वागणूक मिळते
वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी आले तर त्यांच्यासोबत बोलू दिले जात नाही. त्यांनी घेतलेल्या बैठकीला बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले जात नाही. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. महिला आघाडीला तर कोणत्याही बैठकीला बोलविले जात नाही. आम्ही स्वतःहून गेलो तर वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जाते. लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण हे समन्वयक म्हणून बुलडाणा जिल्ह्याला आले असता त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तेव्हा त्यांना सर्व माहिती दिली होती व त्यांनी देखील या सर्व गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत.
लोकसभेच्या प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठलाही खर्च व प्रचार साहित्य दिलेले नाही अशी जिल्ह्यात ओरड आहे. त्यांनी स्वखर्चाने व आपल्या प्रेमापोटी प्रचार केला आहे. आदरणीय साहेब आम्ही या सर्व गोष्टी लोकसभा निवडणुकीपूर्वी कळवणार होतो. परंतु या दोघांच्या दहशतीमुळे कळवता आल्या नाहीत. लोकसभेचे नुकसान पहाता विधानसभेतही असेच होऊ नये म्हणून आपल्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते एकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यातील परिस्थितीतबाबत सांगू इच्छितो. तरी कृपया आम्हाला भेटीसाठी वेळ देण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती.’