महाराष्ट्र

BJP News : दक्षिण नागपूरमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर!

South Nagpur : भाजपची डोकेदुखी वाढली; गडकरी, फडणविसांपुढे पेच

राज्यात सरकार येण्यापूर्वी अर्थात 2014 पूर्वीपर्यंत भाजपचा नागपूरसाठी विधानसभेचा फॉरमॅट ठरलेला होता. दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस, मध्य नागपुरात विकास कुंभारे, पूर्वमध्ये कृष्णा खोपडे आणि पश्चिममध्ये सुधाकर देशमुख ठरलेले उमेदवार होते. उत्तर आणि दक्षिणमध्ये 2014 ला भाजपने नवा फॉर्मुला वापरला आणि त्यात ते यशस्वी झाले. 2019 मध्ये उत्तरेत अपयश आले, पण दक्षिणेत उमेदवार बदलूनही यश आले. मात्र आता गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे असलेला हाच दक्षिण नागपूरचा मतदारसंघ अंतर्गत वादामुळे डोकेदुखी ठरत आहे.

दक्षिण नागपूर मतदारसंघ तसा संमिश्र आहे. याच मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे आणि इथेच ताजबागच्या निमित्ताने मोठा मुस्लीम वर्ग आहे. 2014 पर्यंत दिनानाथ पडोळे या भागाचे आमदार होते. 2014 मध्ये भाजपचे सुधाकर कोहळे विजयी झाले. पण पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी, स्थानिकांच्या तक्रारी यामुळे भाजपने 2019 मध्ये उमेदवार बदलला. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत खास मित्र मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे गिरीश पांडव यांचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण मोहन मते यांनी 3 हजार 987 मतांनी निसटता विजय मिळवला.

सुधाकर कोहळे यांना भाजपने जिल्हाध्यक्ष करून शांत केले होते. त्यामुळे आता ते पुन्हा विधानसभेसाठी आग्रह धरणार नाहीत, असे वाटले होते. मोहन मते यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण गेल्या वर्षभरापासून कोहळे यांनी आपली तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर संपूर्ण दक्षिण नागपुरात नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. अलीकडेच त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

दुसरीकडे मोहन मते सुद्धा जोरदार तयारीला लागले आहे. आपली जागा सोडणार नाही, या भूमिकेतून त्यांनी तयारी सुरू केली आहे. पण त्यांच्याबद्दलही आता श्रेष्ठींकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतल्यास मोहन मते यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. पण फडणवीस आणि गडकरींना खुश करण्यासाठी त्यांनी 14 अॉगस्टला मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला दिल्लीचे खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित राहणार आहेत.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ?

मोहन मते आणि सुधाकर कोहळे यांच्यात उमेदवारीवरून असलेला वाद आता उघड आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही त्याची पूर्ण माहिती आहे. पण या वादात पडण्यापेक्षा तिसराच उमेदवार देऊन मार्ग सोपा करण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने भाजपमध्ये इतरही इच्छुक रांगा लावून आहेतच. कारण लोकसभा निवडणुकीतील चित्र लक्षात घेता कोहळे आणि मते या दोघांच्याही विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. अश्यात ही जागा आपल्या हातून जाऊ द्यायची नाही, यासाठी भाजपने नवा उमेदवार उभा केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

गडकरी म्हणालेच आहेत 

दोन दिवसांपूर्वी मध्य नागपू भाजपची कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ज्येष्ठ आमदार म्हणून कृष्णा खोपडे देखील उपस्थित होते. त्यांनी जोरदार बॅटिंग केली. ‘कोणता सर्व्हे करतात आणि कशी उमेदवारी नाकारतात हे आम्हाला काही कळत नाही’ असे ते म्हणाले. यावेळी गडकरी देखील काही वेळासाठी उपस्थित झाले होते. ‘ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्यालाच उमेदवादी दिली जावी यासाठी माझा आग्रह असणार आहे,’ असे गडकरींनी स्पष्ट केले. त्यामुळे आता विशेषतः दक्षिण नागपुरात भाजप कोणता डाव खेळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!