Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष, संघटना निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीतील मोठे नेतेही आता जिल्हास्तरावर आढावा घेण्यासाठी दौरे करीत आहेत. अशातच अकोला जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अकोला दौऱ्यावर येत आहेत.
मंगळवारी (दि.१३) रात्री उशिरा राऊत यांचं अकोल्यात आगमन होणार आहे. बुधवारी (दि.१४) ते अकोला लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा ते घेणार आहेत. ‘शिव सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत ते उमेदवाराची चाचपणी करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी भाजपच्या तुलनेत चांगली होती. राज्यात शिवसेना ठाकरे गट आता विधानसभा निवडणुकीतही दमदार कामगिरीसाठी तयारीला लागला आहे. त्यासाठी राज्यातील 288 मतदारसंघांवर शिवसेना ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस नंतर आता शिवसेना ठाकरे गटही पक्षातील सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे.
अकोला जिल्ह्यातील पाच पैकी किमान दोन मतदारसंघांवर शिवसेना दावा करण्याची शक्यता आहे. बाळापूर मतदारसंघात सध्या शिवसेनेचा आमदार आहे. तर अकोला पूर्व मतदारसंघासाठी ही ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे किमान दोन मतदारसंघ मिळावे अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर सर्वच मतदारसंघांवर लढण्याच्या शक्यतेमुळे शिवसेना ठाकरे गटाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
असा असेल दौरा
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाची मजबूत बांधणी व निवडणुकीची आखणी करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिव सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिवसेना नेते खासदार संजय राऊत अकोला दौऱ्यावर येत आहेत. असून 13 ऑगस्ट रोजी रात्रीला ते अकोल्यात पोहचणार आहेत. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी 11 ते 2 या वेळेत अकोल्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व आघाड्यांशी विधानसभा निहाय चर्चा करण्यात येणार आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
अकोला पश्चिम, अकोला पूर्व, आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, रिसोड या विधानसभांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सर्व शहरप्रमुख, संघटक, समन्वयक, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, आजी माजी आमदार, महिला आघाडी, शेतकरी सेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा जि.प. सदस्य गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा राहुल कराळे यांनी केले.
असा शोधणार सक्षम उमेदवार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मनोबल वाढले आहे. अकोला जिल्ह्यातील चार मतदारसंघांत सध्या भाजपचे आमदार आहेत. तर एका मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यावरून आंदोलन करत आली आहे.
गुडघ्याला बाशिंग
जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात शिवसेनेने बऱ्यापैकी तयारी केली आहे. शिवसेनेतील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता योग्य आणि इच्छुक उमेदवाराचा शोध घेण्यासाठी खासदार राऊत दोन दिवस अकोल्यात असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गटाची नेमकी काय रणनीती असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.