मातोश्रीसमोर ज्यांनी आंदोलन केले, ते खास सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मातोश्रीबाहेर आंदोलन झालं होतं, ते सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते. मुंबईमध्ये सुपारीचं काम जास्त चालतंय. हे काम दिल्लीमधून होतंय. लोकांना भडकविण्याचे काम सध्या सुरु आहे. मातोश्रीबाहेर वक्फ बोर्डाच्या बिलाच्या निमित्ताने दहा-वीस लोक आले अन् घोषणाबाजी करून गेले. काहीही कारण नव्हतं, अजून या बिलावर संसदेत चर्चा व्हायची आहे. पण तरीही मातोश्रीवर आंदोलन झालं, असं राऊत म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी जमावाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे ९ खासदार लोकसभेत पाठवले, मात्र वक्फ बोर्ड संदर्भातील विधेयकाला विरोध न करताच ते सभागृहातून बाहेर निघाले. याच रोषामुळे मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
या आंदोलनावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर माध्यमांसमोर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, ‘मातोश्रीच्या बाहेर १० ते १२ लोक आले होते. ते लोक कोणी पाठवलेले होते? ती सुपारी कोणाची होती? याचे सर्व पुरावे आहेत. आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक वर्षावर राहणारे होते. त्या लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं.’ संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले आहेत. पुरावे दाखवत संजय राऊत यांनी अकबर सय्यद, सलमान शेख, अफराफ सिद्धिकी, अक्रम शेख हे यांचे फोटो दाखवले आहेत.
राऊत तर बाळासाहेबांचेही झाले नाहीत
आंदोलन करणारी माणसं एकनाथ शिंदेंची होती असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. संजय राऊत बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुसलमान समाजाचे कसे होणार? असा सवाल नितेश राणेंनी विचारलाय. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या दादा भुसेंनी देखील राऊतांवर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत हा दिशाभूल करणारा माणूस आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक?
सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख दुरुस्त्यांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संसदेत वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारे विधेयक सादर केले. या विधेयकाला अखिलेश यादव, के. सी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसीसह विरोधकांनी विरोध करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तर जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचे समर्थन केले.