राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या व शेण भिरकावले. त्यांनतर त्यांच्या कार्यक्रमातही घुसून राडा केला. मनसेच्या या कृतीचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी समर्थन केले आहे. ‘उद्धव यांना जशास तसे उत्तर मिळाले’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मनसेच्या राड्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्ट करत महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ‘जसे पेराल तसेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसारच ही प्रतिक्रिया उमटली आहे,’ असे जाधव यांनी म्हटले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा राज्यात एकही सभा घेऊ देणार नाही’, असा थेट इशारा उद्धव ठाकरे व शरद पवारांना दिला होता.यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या व शेण भिरकावले. ‘तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, आता आमच्या नादी लागू नका,’ असे सांगत राज ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रतापराव जाधव म्हणाले, ‘राज ठाकरे साहेबांच्या गाडीवर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपार्या फेकल्या. त्याचेच प्रत्युत्तर म्हणून काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या गाडीवर बांगड्या व इतर साहित्य फेकून जशाला तसे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कालची क्रिया म्हणजे बीडमध्ये झालेल्या घटनेची प्रतिक्रिया आहे. जे पेराल तेच उगवेल,’ असे प्रतापराव जाधव म्हणाले. ते शेगावात माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीची हुजरेगिरी
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीला निधी आणण्यासाठी जातात. त्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी या राज्याला मिळतो. तेव्हा हे नेते पाय चाटायला दिल्लीला जातात असा आरोप विरोधकांकडून होतो. मग सत्ता नसताना फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीला दोन दिवस मुक्कामी राहून कोणाकोणाच्या समोर हुजरेगिरी केली हे आता उद्धव ठाकरे यांनी सांगावे,’ अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.