Nanded Meeting: महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करण्याऐवजी कमिशनखोरी करुन मलाई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे. या असंवैधानिक सरकारवर जनतेचा विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत जसे यांना नाकारले, तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरु आहेत. आज (रविवार) नांदेडमध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ‘महायुती सरकारकडे जनतेच्या योजनांसाठी पैसे नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही योजना जाहीर केल्या आहेत. त्यासाठी इतर योजनांचा पैसा वापरला जात आहे. विधान सभा निवडणुकीला काँग्रेस मविआ एकत्र सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे. एक सक्षम जनतेचे सरकार देण्याचा मविआचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर ठाण्यात शेण व नारळ फेकण्यात आले, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, राजकारणात असे प्रकार होऊ नयेत,’ असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
मराठवाड्यात परिवर्तनाची लाट – पटोले
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची एक जागा सोडली; तर महायुतीच्या विचारांना जनतेने नाकारले आहे. मराठवाड्यात परिवर्तनाची लाट आहे. नांदेड शहर व जिल्हा खऱ्या अर्थाने २४ फेब्रुवारीला स्वतंत्र झाला असे चित्र दिसत आहे. २४ फेब्रुवारी हा दिवस काँग्रेसच्या उन्नतीचा दिवस ठरला आहे. भाजपाने दुसऱ्यांची घरे फोडली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे घरही फोडले पण आता चित्र बदलले आहे. नांदेडमध्ये अनेक जण काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ लागले आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
भ्रष्ट युतीचा पर्दाफाश
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानीबद्दल प्रश्न विचारला असता खोट्या प्रकरणाच्या आधारे त्यांचे सदस्यत्व घालवले होते. पण राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी आणि सेबी प्रमुखाच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केला आहे. सेबी व अदानी मिळून कसे गोरख धंदा करत होते ते समोर आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.