Thackeray Vs Thavkeray : एकनाथ शिंदे गटाला फायदा पोहोचविण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरु करण्याचे षडयंत्र भाजपाने रचले आहे, आरोप विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नांदेडमध्ये बोलताना वडेट्टीवार यांनी ठाण्यातील घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला. शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. हा प्रकार मर्यादेचे उल्लंघन होते, असे ते म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. त्यांना कुठे जावे, काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. राज द्विधा मनस्थितीत ते सापडले आहेत. निवडणुकीत एकनाथ शिंदेंना फायदा पोहोचविण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये लढाई सुरू करण्यात आली आहे. हे षडयंत्र भाजपाने रचले आहे. मतांचे विभाजन करण्याच्या हेतूने हा सगळा खेळ सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभा निडणुकीच्या आधी राज ठाकरे भाजपवर टीका करत होते. अचानक त्यांना काय झाले, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
भाजप जबाबदार
लोकसभा निडणुकीच्या आधीची राज ठाकरे भाजपवर टीका करत होते. आता महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे गोंधळलेले दिसतात. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटवण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. काही झाले तर शरद पवार यांचे नाव घेतले जाते. राज ठाकरे म्हणतात, शरद पवार यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. अशी विधाने चुकीची आहेत. दोन ठाकरे भावांमध्ये वाद निर्माण करून भाजप मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
राज ठाकरे सुपारी बाज
बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर ‘सुपारीबाज’ म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. मनसैनिकांनी आंदोलन करत, ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणाचा, बांगड्यांचा मारा केला. भर रस्त्यात त्यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण फेकले. ताफा पुढे आल्यानंतर नारळही फेकण्यात आलेत. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले.
महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला. त्याचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे आहेत. या आरोपात तथ्य नाही. परमबीर सिंह धादांत खोटे बोलत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्यावर तत्काळ त्यांना घरी पाठवायला हवे होते. मात्र त्यावेळी महाविकास आघाडी सरकारची चूक झाली. आता परमवीर शिंह भाजपच्या इशाऱ्यावर खोटे बोलत आहेत, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.